कोल्हापूर जिल्ह्यात आडसाली ऊस पाण्यात कुजला! | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात आडसाली ऊस पाण्यात कुजला!

कोल्हापूर : एकनाथ नाईक : पावसामुळे पिकात पाणी साचून राहिल्याने 19 हजार 200 हेक्टरवरील आडसाली उसाची लावण धोक्यात आली आहे. आता पाऊस थांबला नाही तर उगवून आलेला ऊस कुजण्याची शक्यता आहे. यंदाचा हंगाम ऊस पिकाच्या दृष्टीने परीक्षा पाहणारा ठरला आहे.

सन 2020-21 हंगामातील उसाचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नवीन 2021-22 हंगामातील आडसाली लावणीची शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. काही शेतकर्‍यांची ऊस लावण पूर्ण झाली. मात्र, सतत पडणार्‍या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आडसाली ऊस पीक पावसाने भिजून साचलेल्या पाण्यात कुजू लागले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 20 ते 30 टक्के ऊस आडसाली असतो. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत याची लावण होते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरअखेर 30 टक्के उसाची लावण पूर्वहंगामी आणि डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत 50 टक्के ऊस लावण ही चालू हंगामाची होते. सध्या शेतकर्‍यांची आडसाली ऊस लावणीची धांदल सुरू आहे.

काही शेतकर्‍यांनी महापूर ओसरल्यानंतर जुलैअखेर आणि ऑगस्ट महिन्यात गतीने आडसाली उसाची लावण केली आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिवारात पाणीच पाणी आहे. या पाण्यात उगवून आलेला ऊस पूर्णतः बुडाल्याने कुजला आहे. काही शेतकर्‍यांनी उसाची रोपे लावली असून, तीदेखील कुजून जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार ऊस लावण करावी लागणार आहे.

शेतकर्‍यांनी पावसामुळे पूर्वहंगामी ऊस लावण तूर्तास थांबविली आहे. पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकर्‍यांनी ऊस बियाणे, मशागत, खते, भांगलणीसाठी केलेला खर्चदेखील तोडणी केलेल्या ऊस पिकातून निघत नाही, अशी स्थिती आहे. सन 2019 पासून सलग तीन वर्षे ऊस पिकाला पावसाचा झटका आणि महापुराचा जोरदार फटका बसला आहे. प्रत्येक वर्षी येणार्‍या महापुरात शेतकर्‍यांच्या ऊस पिकाची मोठी हानी होत आहे. दरवर्षी असाच पाऊस आणि महापूर येत राहिला तर करायचं काय? असा शेतकर्‍यांसमोर प्रश्न आहे.

पूर्वहंगामी लावण लांबणार

खरिपानंतर पूर्वहंगामी लावण करण्यासाठी ऊस उत्पादक प्रयत्न करतात. सध्याची परिस्थिती पाहिली तर खरीप काढणी होऊन रान तयार करण्यास किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी निश्चित लागणार आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये कितपत नव्या लावणी होतील याबाबत शंकाच आहे. दररोज पावसाच्या सरींवर सरी सुरू आहेत. यामुळे बहुतांशी लावण चालू हंगामातच होईल, असे कृषितज्ज्ञांना वाटते.

जिल्ह्यातील 19 हजार 200 हेक्टरवर आडसाली ऊस लावण पूर्ण झाली आहे. जून, जुलै, ऑगस्टअखेर शेतकर्‍यांनी ही लावण केली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने सरींमध्ये पाणी साचून उसाची रोपे पाण्याखाली जाणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे. सरीतील पाण्याचा निचरा होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
डी. डी. वाकुरे, जिल्हा कृषी अधीक्षक

Back to top button