कोल्हापूर : अंबाबाई मंदिर किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गळ्यापर्यंत | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गळ्यापर्यंत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : निरभ्र वातावरणामुळे गुरुवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचली. प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य कलेचा आविष्कार असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दक्षिणायन कालखंडातील किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ५ वाजून ४४ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श केला आणि ५. वाजून ४८ मिनिटांनी गळ्यापर्यंत ती पोहोचली. किरणोत्सव पाहण्यासाठी भाविक-पर्यटकांनी गर्दी केली होती.

वर्षाच्या दक्षिणायणाच्या कालखंडातील किरणोत्सवास गुरुवारी सायंकाळी वाजून १ मिनिटांनी सूर्यकिरणे पश्चिमेकडील महाद्वारातून मंदिराच्या दिशेने आली. ५ वाजून ४ मिनिटे ते ५ वाजून २० मिनिटे असा गरूड मंडपातून प्रवास केला. गणपती मंदिरापासून ते गणपती चौकापर्यंत ५ वाजून २४ मिनिटांनी किरणे पोहोचली. कासव चौकात ५ वाजून ३१ मिनिटांनी तर पितळी उंबऱ्यावर ५ वाजून ३४ मिनिटांनी किरणे पोहोचली. खजिना चौकात ५ वाजून ३६ मिनिटांनी आणि चांदीच्या उंबऱ्यावर ५ वाजून ३८ मिनिटांनी किरणे पोहोचली. ५ वाजून  ४२ मिनिटांनी संगमरवरी पायऱ्यांवर प्रवास करत ५ वाजून ४४ मिनिटांनी देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला. यानंतर ५ वाजून ४६ मिनिटांनी कमरेपर्यंत आणि ५ वाजून ४८ मिनिटांनी मूर्तीच्या गळ्यापर्यंत सूर्यकिरणे पोहोचली.

Back to top button