खा. राहुल गांधी यांच्याकडून आ. सतेज पाटील यांच्या ‘एलईडी स्क्रीन रथ’ चे कौतुक | पुढारी

खा. राहुल गांधी यांच्याकडून आ. सतेज पाटील यांच्या ‘एलईडी स्क्रीन रथ’ चे कौतुक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  भारत जोडो यात्रेच्या दुसर्‍या दिवशी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. सतेज पाटील हे खा. राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले. राहुल गांधी यांच्यासोबत चालताना आ. पाटील यांनी एलईडी स्क्रीन रथ उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. भारत जोडो यात्रा कोल्हापूर जिल्ह्याच्या गावागावांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. गांधी यांनी ‘व्हेरी गुड बंटी’ म्हणत आ. पाटील यांच्याशी हस्तांदोलन केले.

खा. गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे महाराष्ट्रात दाखल झाली. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी सायंकाळच्या सत्रात नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील खतगाव फाटा ते शंकरनगर रामतीर्थ या मार्गामध्ये सतेज पाटील यांनी राहुल गांधींशी चर्चा केली. 13 एलईडी स्क्रीन रथाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील 1239 गावे आणि कोल्हापूर तसेच इचलकरंजी शहर व 13 नगरपालिका या ठिकाणी 100 दिवस भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखवण्याचा भारतातील पहिला नावीन्यपूर्ण उपक्रम असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली.

या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी यांच्यापर्यंत भारत जोडो यात्रा पोहोचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. तसेच 100 दिवस हे एलईडी स्क्रीन रथ कशा प्रकारे गावागावांत पोहोचणार आहेत, याचीही सविस्तर माहिती दिली. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे खा. गांधी यांनी कौतुक करत आ. पाटील यांच्याशी हस्तांदोलन केले.

Back to top button