Sudha Murthy : कुरूंदवाड शाळेच्या दुरुस्तीचा खर्च देणार; सुधा मुर्ती यांचे आश्वासन | पुढारी

Sudha Murthy : कुरूंदवाड शाळेच्या दुरुस्तीचा खर्च देणार; सुधा मुर्ती यांचे आश्वासन

कुरुंदवाड; जमीर पठाण : शाळा दुरुस्तीला शासन पैसे देत नाही का? काय अडचण आहे का? याबाबतचे सवाल इन्फोसिसच्या निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधा मूर्ती यांनी अपस्थित केले. कुरुंदवाड येथील शाळेची दुरावस्था पाहून त्यांनी याबाबत विचारणा केली.  मोडकळीस आलेले छत, झाडाच्या पाला पाचोळ्यांनी व्यापलेले कौलारू छत, फरशीवर साचलेली धूळ अशी दुरावस्था त्यांना पहावी लागली. या शाळेला अभिवादन करताना त्यांनी शाळेच्या दुरुस्तीबाबतचा खर्च देण्याचे आश्वासन यावेळी दिले. (Sudha Murthy)

कुरुंदवाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १९५५ साली सुधा मूर्ती यांचे वडील डॉ. रामचंद्र कुलकर्णी हे सेवेत होते. केंद्राच्या निवासस्थानात सुधा मूर्ती व त्यांचे बंधू श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म झाला आहे. सुधा मूर्ती यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण येथील कन्या विद्या शाळेत झाले आहे. यावेळी सुधा मूर्ती त्यांनी शाळेची व त्या रहात होत्या त्या परिसराची आत्मियतेने पाहणी केली. (Sudha Murthy)

सुधा मुर्ती या ठिकाणी भेट देणार आहेत याची कल्पना प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना तहसीलदार अपर्णा मोरे यांनी दिली होती. तरीदेखील त्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डोळे झाकपणा केला. छतापासून जमिनीपर्यंत कोष्टी किड्यांच्या जाळ्या लोंबकळत होत्या. कौलावर झाडांचा पाला साचलेला होता. त्यामुळे दुर्गंधी देखील सुटली होती. अस्वच्छतेच्या गर्तेत सापडलेल्या या खोलीत कशीतरी वाट काढत जात असताना सुधा मूर्ती या भावनिक झाल्या. आपल्या घराची व घरातील प्रत्येक खोलीची पाहणी करत जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अस्वच्छतेचा प्रकार पाहून त्यांच्यासह उपस्थित असणारे अधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनाही प्रचंड मनस्ताप झाला होता.

दरम्यान कन्या विद्या मंदिर येथे चौथीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला त्यांनी भेट दिली. मुख्याध्यापक रविकुमार पाटील हे त्यांना त्या शिकत असलेल्या वर्गापर्यंत घेऊन गेले. त्या ठिकाणीही त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेची दुरावस्था पाहून दुरुस्तीसाठी शासन पैसे देत नाही का अशी खंत सुधा मुर्ती यांनी व्यक्त केली. शाळेच्या दुरुस्तीसाठी मी पैसे देईन माझ्याकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा

Back to top button