ना.सत्तारांच्या वक्तव्याचा कोपरगावी निषेध, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सत्तारांची प्रतिमा जाळली | पुढारी

ना.सत्तारांच्या वक्तव्याचा कोपरगावी निषेध, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सत्तारांची प्रतिमा जाळली

कोळपेवाडी, पुढारी वृत्तसेवा: कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत शिवराळ भाषेचा वापर करून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, याचे पडसाद कोपरगाव तालुक्यात देखील पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून ती प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला.

खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राज्यभरातून त्यांचा निषेध केला जात असताना कोपरगावमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. खा. सुप्रिया सुळे महाराष्ट्राचे भूषण आहेत.

सलग सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणार्‍या देशाच्या त्या एकमेव खासदार आहेत. अशा व्यक्तीबद्दल त्यांनी निंदनीय वक्तव्य केले, त्याचा निषेध करीत आहे. 50 खोक्यांचा विषय मोठ्यापासून लहानापर्यंत चर्चिला जात आहे. कुठेतरी सत्तेची गुर्मी दिसत असून, महिलांबाबत सत्ताधारी मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे. राज्य सरकारने मंत्री सत्तार त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, महिला जिल्हा सचिव रेखा जगताप आदी उपस्थित होते.

Back to top button