गडहिंग्लज गोडसाखर निवडणूक : पहिल्या फेरीअखेर मुश्रीफांच्या छ. शाहू आघाडीकडे कल | पुढारी

गडहिंग्लज गोडसाखर निवडणूक : पहिल्या फेरीअखेर मुश्रीफांच्या छ. शाहू आघाडीकडे कल

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (गोडसाखर) संस्था गटातील विजयानंतर गडहिंग्लज-हनिमनाळ, कडगाव-कौलगे गटातील बहुतांश केंद्रांवर मुश्रीफांच्या छ. शाहू समविचारी आघाडीला मतदारांचा कल असल्याचे दिसून येत आहे. जवळपास २० केंद्रांअखेर ११०० हून अधिक मतांची आघाडी मुश्रीफांच्या पॅनेलने घेतल्याने नूल-नरेवाडी गटातून विरोधी काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीला हे मतदान वजा करताना दमछाक होणार आहे.

गडहिंग्लज शहरात जनता दलाचे प्रभुत्व असल्याने या ठिकाणी मुश्रीफांच्या पॅनेलला कमी मतदान व आ. राजेश पाटील यांच्या आघाडीला अधिक मतदान होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणीही चांगल्या पद्धतीची आघाडी घेण्यात काळभैरव आघाडीला अपयश आले आहे.

दरम्यान, सकाळी संस्था गटात आ. मुश्रीफ यांच्या छ. शाहू आघाडीचे सोमनाथ अप्पी पाटील यांनी आ. राजेश पाटील यांच्या श्री काळभैरव आघाडीचे उमेदवार व कामगार नेते शिवाजी खोत यांना १६२ मतांनी पराभूत केले आहे. खोत यांना ३७ मते मिळाली तर १ मत बाद झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचीच दोन पॅनेल एकमेकासमोर उभी ठाकली होती. आ. हसन मुश्रीफ यांनी माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांना सोबत घेत छ. शाहू समविचारी आघाडी केली होती. या विरोधात चंदगडचे आ. राजेश पाटील, माजी आ. अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, कामगार नेते शिवाजी खोत यांच्या श्री काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीने टक्कर दिली. प्रचार सभांच्या निमित्ताने तुंबळ युद्ध रंगले होते.

Back to top button