गडहिंग्लज गोडसाखर निवडणूक : आमदार मुश्रीफ गटाची विजयी आघाडी | पुढारी

गडहिंग्लज गोडसाखर निवडणूक : आमदार मुश्रीफ गटाची विजयी आघाडी

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (गोडसाखर) मतमोजणीला आज सकाळी प्रारंभ झाला आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संस्था गटाचा पहिला निकाल जाहीर झाला. यामध्ये आ. हसन मुश्रीफ यांच्या छ. शाहू आघाडीचे सोमनाथ अप्पी पाटील यांनी आ. राजेश पाटील यांच्या श्री काळभैरव आघाडीचे उमेदवार व कामगार नेते शिवाजी खोत यांना १६२ मतांनी पराभूत केले आहे. खोत यांना ३७ मते मिळाली तर १ मत बाद झाले. दरम्यान, पहिल्या फेरीत उत्पादक गटात गडहिंग्लज-हनिमनाळ व कडगाव कौलगे गटात आ. मुश्रीफ यांच्या छ. शाहू आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने गडहिंग्लज शहरात दोन्ही आघाड्या समान पातळीवर राहिल्याचे दिसत आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचीच दोन पॅनेल एकमेकासमोर उभी ठाकली होती. आ. हसन मुश्रीफ यांनी माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांना सोबत घेत छ. शाहू समविचारी आघाडी केली होती. या विरोधात चंदगडचे आ. राजेश पाटील, माजी आ. अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, कामगार नेते शिवाजी खोत यांच्या श्री काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीने टक्कर दिली. प्रचार सभांच्या निमित्ताने तुंबळ युद्ध रंगले होते. दोन्हीकडूनही विजयाचा दावा करण्यात येत आहे. एकूणच तापलेल्या वातावरणात आजच्या निकालाच्या दिवसाकडे संपूर्ण जिल्ह्यासह सीमाभागाचे लक्ष लागले आहे.

Back to top button