गणेशोत्सव : गौराई आली अंगणी | पुढारी

गणेशोत्सव : गौराई आली अंगणी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ‘सोन्या-मोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई, पंचपक्वान्न, झिम्मा-फुगडी, पूजा आरतीची घाई, अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया, घरादारा लाभली सदा कृपेची छाया,’ अशा भावनेने घरोघरी गौराईचे आगमन झाले. गणेशोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी (रविवारी) घरोघरी गौराईचे उत्साहात आगमन झाले.

यंदा नदीचे पाणी पात्रातच असल्याने महिलांनी पंचगंगा घाट, रंकाळा तलावासह विविध पाणस्थळांच्या ठिकाणी गर्दी केली होती.

दुपारी गौराईचे घराघरांत आगमन झाले. यानंतर महिलांनी हळदी-कुंकू वाहिले. रात्री गौराईला दागिन्यांनी सजवून तिच्या भोवती आरास करण्यात आली. शहरातील सर्व पेठांसह उपनगरे व ग्रामीण भागात गौरी आवाहनाचा सण विविधतेने आणि उत्साहात साजरा झाला. दरम्यान, सोमवारी (दि.13) शंकर आगमन आणि गौरी पूजनाचा साहळा होणार आहे.

’उगवला सूर्य, मावळला शशी …’

’उगवला सूर्य, मावळला शशी …… यांचे नाव घेते, गौराई पूजनाच्या दिवशी’, ’गौरी-गणपती समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी…. यांचे नाव घेते गौरी पूजनाच्या दिवशी’, ’नाही मला द्वेष, मत्सर, नाही हेवा …. यांचे नाव घेते … यांची सून सगळ्यांनी लक्ष ठेवा,’ असे उखाणे घेत महिलांनी पाणस्थळांच्या काठी झिम्मा-फुगडीचा फेर धरला.

पारंपरिक वेशभूषा अन् वाद्यांचा गजर…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे नियम पाळून गौराई आगमनाचा सोहळा महिलांनी साजरा केला. नऊवारी साडी, दागिने, नथ, गजरे अशी पारंपरिक वेशभूषा करून महिला गौरी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. मास्कचा वापर मात्र यंदा कमीच दिसला. पारंपरिक वाद्ये आणि बेंजो पथकाच्या साथीने गौराईचे उत्साहात आगमन झाले. अधून-मधून बरसणार्‍या पावसाच्या सरी आणि ऊन असे उत्साही वातावरण होते.

Back to top button