कोल्हापूर : इथेनॉलची दरवाढ मागणीच्या निम्मीच! | पुढारी

कोल्हापूर : इथेनॉलची दरवाढ मागणीच्या निम्मीच!

कुडित्रे, प्रा. एम. टी. शेलार : जिल्ह्यामध्ये आठ कारखान्यांकडे इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहेत. त्यांची दैनंदिन उत्पादन क्षमता 4 लाख 10 हजार लिटर आहे. गेल्या इथेनॉल हंगामात सुमारे 3 कोटी 67 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. इथेनॉलच्या दरामध्ये सरासरी प्रतिलिटर सुमारे 2 रुपयांची वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना केेवळ आठ कोटींचा अतिरिक्त रेव्हेन्यू मिळेल, अशी अपेक्षा साखर कारखानदारांतून व्यक्त होत आहे.

साखर कारखानदारांचा अपेक्षाभंग

उसाच्या रसापासून उत्पादित इथेनॉलला प्रति लिटर 70 रुपये तर बी हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलला प्रति लिटर 64 रुपये दर मिळावा, अशी मागणी इथेनॉल उत्पादकांनी केली होती. सी हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलला कारखानदार फारसे इच्छुक नाहीत. सरकारने ऊस रसापासून उत्पादित इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये 16 पैसे, बी हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलच्या दरात 1 रुपये 65 पैसे व सी हेवी मोलॅसिसपासून उत्पादित होणार्‍या इथेनॉलमध्ये 2 रुपये 75 पैशाची वाढ केली आहे. या तुटपुंज्या वाढीमुळे साखर कारखानदार नाराज आहेत. या दरवाढीने डोक्यावरील कर्जाचा व व्याजाचा बोजा थोडा कमी होईल एवढेच.

जिल्ह्याची दैनंदिन क्षमता 4.10 लाख लिटर्स

जिल्ह्यात गुरुदत्त, सदाशिवराव मंडलिक, शरद नरंदे, शाहू कागल, दत्त दालमिया, दत्त शिरोळ, सरसेनापती घोरपडे, तात्यासाहेब कोरे वारणा या साखर कारखान्यांकडे इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहेत. या सर्वांची दैनंदिन उत्पादन क्षमता सुमारे 4 लाख 10 हजार लिटर आहे. इथेनॉलच्या आर्थिक वर्षात सुमारे 3 कोटी 67 लाख लिटर उत्पादन होते. सरासरी दरवाढ दोन रुपयांची धरली तर या साखर कारखान्यांच्या एकूण उत्पन्नात केवळ आठ कोटीची भर पडेल. पण साखर कारखान्यांचा वाढलेला उत्पादन खर्च आणि उसाची वाढलेली एफआरपी लक्षात घेतली तर या कारखान्यांच्या हातात फारसे काही पडेल अशी शक्यता नाही. डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प यावर्षी कार्यान्वित होत असून कुंभी कासारीचा प्रकल्प उभारणीच्या अवस्थेत आहे.

शेतकर्‍यांना लाभ काय?

ऊस उत्पादकांना रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार दर मिळाला तरच या वाढीचा फायदा होणार आहे. अन्यथा केवळ एफआरपी देताना कारखान्यांची ओरड कमी होणार आहे एवढेच. उसाची वाढलेली किंमत आणि वाढलेला प्रक्रिया खर्च विचारात घेऊन शासनाने इथेनॉलचा दर दोन रुपयांनी वाढवलेला आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जादा दराची वाढ अपेक्षित होती. इथेनॉलचे नवीन प्रकल्प येण्यासाठी आकर्षक दराची घोषणा करावी, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केली.

Back to top button