

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 4) कोल्हापुरात आंतरराज्य समन्वय बैठक होत आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीसह सीमावर्ती जिल्ह्यांत सर्वसामान्यांना भेडसावणार्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील पाच, तर कर्नाटकातील चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि तीन विभागीय आयुक्त या बैठकीत सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती गंभीर करणार्या अलमट्टी धरणाचा पाणीसाठा नियंत्रण आणि संभाव्य उंची वाढवण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे गुरुवारी रात्री आगमन झाले; तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शुक्रवारी सकाळी दहा वाजता कोल्हापुरात आगमन होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांतील विविध प्रश्नांवर ही बैठक होत आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या महाराष्ट्रातील, तर बेळगाव, विजयपुरा, कलबुर्गी आणि बिदर या कर्नाटकातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यांचे प्रश्न या बैठकीत मांडणार आहेत.
पुणे विभागीय आयुक्त तसेच कर्नाटकच्या वरील चार जिल्ह्यांचे दोन विभागीय आयुक्तही यावेळी उपस्थित राहणार आहेत. येथील रेसिडन्सी क्लबमध्ये सकाळी 11 वाजता या बैठकीला प्रारंभ होणार आहे.
प्रथमच द्विपक्षीय स्वरूपाची ही बैठक होत असून, त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बैठकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचार्यांना पोलिसांनी पास दिले आहेत. केवळ पासधारकांनाच रेसिडन्सी क्लब परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.
सीमाभागातील जिल्हाधिकारी जिल्ह्यांतील आंतरराज्यस्तरावरील प्रश्न मांडणार आहेत. हे प्रश्न समजून घेऊन, त्यांच्या सोडवणुकीसाठी दोन्ही राज्यांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे बैठकीत सहभागी होणार्या सर्व जिल्हाधिकार्यांकडून या प्रश्नांबाबत तयारी करण्यात आली आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार अलमट्टी धरणाच्या उंचीबाबतचा प्रश्न मांडणार आहेत. त्यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, हत्तींचा उपद्रव, सीमाभागात पशुखाद्य उपलब्धता, कोरोनाने कर्नाटकात मृत झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येणारे अनुदान तसेच विद्यार्थी दाखले आदी प्रश्न ते मांडणार आहेत.