कोल्हापूर : मुलीचे अपहरण करणार्‍या संशयिताला कोठडी | पुढारी

कोल्हापूर : मुलीचे अपहरण करणार्‍या संशयिताला कोठडी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला फूस लावून 18 दिवसांपासून पसार झालेल्या संशयित तरुणाला कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी रात्री कर्नाटकातील संकेश्वरमधून ताब्यात घेतले. अल्ताफ मिन्हाजअहमद काझी (वय 22, रा. पाचगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 8 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संबंधित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

संबंधित मुलीची शाळा सुटल्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून काझी हा मुलीसह पसार झाला होता. संकेश्वरमध्ये एक खोली भाड्याने घेऊन तो राहत होता. त्याने 28 ऑक्टोबर रोजी बहिणीला फोनवरून सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर फोन बंद ठेवला होता. त्यानंतर त्याने कोणत्याच नातेवाईकाशी संपर्क साधला नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.

पोलिसांची आठ पथके तैनात

संशयित व अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची 4 पथके, सायबर पोलिस, मानवी व्यापार प्रतिबंधक पथक आणि जुना राजवाडा पोलिसांची दोन पथके, अशी एकूण आठ पथके तैनात करण्यात आली होती. सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, स्थानिक पोलिसांकडून माहिती संकलन, अशा वेगवेगळ्या मार्गांनी दोघांचाही शोध सुरू होता.

स्थानिक गुन्हे शाखेला यश

कर्नाटकातील संकेश्वर भागात संशयित काझीचे शेवटचे मोबाईल लोकेशन पोलिसांना मिळाले होते. यामुळे पोलिसांनी संकेश्वर परिसरात त्याचा शोध सुरू केला होता. मात्र, तो मोबाईलच वापरत नसल्याने तपासात विलंब होत गेला. या पथकातील सहायक फौजदार श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, हिंदुराव केसरे, सचिन देसाई यांच्या पथकाने संशयिताचा शोध घेतला.

मित्रांकडून जमवली 40 हजारांची रक्कम

काझी हा दुचाकी दुरुस्तीची कामे करतो. कोल्हापुरातून निघण्यापूर्वी त्याने काही ग्राहकांकडून अ‍ॅडव्हान्स रक्कम तसेच मित्रांकडून 40 हजारांची रक्कम घेतली होती. यातूनच तो खर्च करीत होता.

नवे आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीबाबत त्याला विचारणा होऊ नये, यासाठी मुलीचे बनावट आधार कार्ड बनविण्याचा काझीचा प्रयत्न सुरू होता. या आधार कार्डवर खोटे वय टाकून घेण्यासाठी संकेश्वरमधील एका नेट कॅफेमध्ये गेल्याचे तपासात पुढे आले आहे. ही माहिती पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरली.

कर्नाटकातील संघटनांची मदत

पोलिसांनी संकेश्वरमधील काही सामाजिक संघटनांशीही संपर्क साधला होता. तसेच संशयित मुलाचे फोटो त्यांना दाखवले होते. यावेळी त्याच्याविषयीची माहिती पोलिसांच्या हाती लागली. यातूनच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेतला.

काझीविरोधात गंभीर गुन्हे दाखल

संशयित अल्ताफ काझी याच्याविरोधात अपहरण (कलम 363), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (कलम 4, 8 व 12), विनयभंग (354 ड), 366 अ, 376 आय, एन नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Back to top button