कोल्हापूर : रस्त्यांचे निकृष्ट काम करणार्‍या कंत्राटदारांकडून खर्च वसूल करणार : दीपक केसरकर

कोल्हापूर : रस्त्यांचे निकृष्ट काम करणार्‍या कंत्राटदारांकडून खर्च वसूल करणार : दीपक केसरकर
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या चार समित्या बनविल्या असून खड्डे मुजविण्याच्या निकृष्ट कामाची समिती चौकशी करेल. दोषींवर कडक कारवाईबरोबरच निकृष्ट काम करणार्‍या कंत्राटदाराकडून त्याचा खर्च वसूल केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर दौर्‍यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री केसरकर म्हणाले, दरवर्षी पंढरपूर आषाढी व कार्तिकी एकादशीला जाणार्‍या भाविकांची संख्या लाखोंवर असते. वाहनांचे प्रमाण जास्त असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त बैठक होईल. यात वारकर्‍यांसमवेत अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी राज्य सरकार उपाययोजना करणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची लवकरच भेट घेणार आहे. वारकर्‍यांसाठी वॉकिंग ट्रॅक उभारण्याबाबत चर्चा करणार आहे.

यावर्षी कमी वेळेत कोल्हापूरचा दसरा महोत्सव साजरा केला. पुढील वर्षी नियोजन करून म्हैसूर प्रमाणेच भव्यदिव्य असा दसरा महोत्सव साजरा केला जाणार असून त्याच्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात येतील. राजर्षी शाहू महाराज यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाहू मिलच्या जागेवर कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करावे, या पर्यायांचा विचार सुरू आहे. शेंडापार्क येथे 34 एकर जागेत आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. उच्च न्यायालय खंडपीठ न्यायालय संकुलासाठी जागा आरक्षित ठेवली आहे.

कोल्हापुरात प्री-एनडीए अकॅडमीची स्थापना केली जाईल. कोल्हापूर शहरातील दहा व ग्रामीण भागातील सहा तालमींना संपूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी दिली जाणार आहे. माजी खा. संभाजीराजे यांच्यासमवेत लवकरच राधानगरीला भेट देणार आहे. पेरियार लेकच्या धर्तीवर राधानगरी पर्यटननगरी बनविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले. राजाराम हायस्कूल कोल्हापूरचे भूषण आहे, ती बंद केले जाणार नाही. ही ऐतिहासिक वास्तू दुरुस्त करण्यासाठी सूचना, सल्ले घेत आहे.

हायस्कूल व ज्यु. कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पर्यायी जागेची पाहणी करण्यास प्रशासनास सांगितले आहे. कोटयावधी रुपये खर्चून लवकरच नवीन हायस्कूल उभारले जाणार आहे. अंबाबाई मंदिराचा विकास करण्याच्या द़ृष्टीने शेतकरी बजार यांच्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच ती जागा लिजवर घेऊन आवश्यक त्या सुविधा दिल्या जातील. तेथील आठ शासकीय कार्यालये इतरत्र स्थलांतरित केली जाणार असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.

आ. राणे यांच्या 'लव्ह जिहाद'च्या वक्तव्यात तथ्य नाही

आ. नितेश राणे यांनी कोल्हापुरात 'लव्ह जिहाद'बद्दल केलेल्या वक्तव्यात तथ्य नाही. या प्रकरणाचा पोलिस चांगल्या प्रकारे तपास करीत आहेत. प्रेम प्रकरणातून पळून गेलेल्या व्यक्तीस पोलिस कोठडी मिळाली आहे. सामाजिक ऐक्य ही कोल्हापूरची परंपरा आहे. त्याला वेगळे वळण लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे गट संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारेंना पाठविले

महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची पावन भूमी आहे. राजकारणात चुकीचे घडले हे मान्य करून खरे बोलायला शिकले पाहिजे. यापूर्वी शिवसेनाविरोधात सुषमा अंधारे काय बोलत होत्या हे जनतेने ऐकले आहे. राष्ट्रवादीने शिवसेना संपवली आहे. उरलीसुरली शिवसेना उद्धव ठाकरे गट संपण्यासाठी त्यांनी अंधारे यांना पाठविले असल्याची टीका मंत्री केसरकर यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news