मृत वारकर्‍यांच्या कुटुंबीयांना लवकरच मदत : दीपक केसरकर | पुढारी

मृत वारकर्‍यांच्या कुटुंबीयांना लवकरच मदत : दीपक केसरकर

शिरोली एमआयडीसी/गांधीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुनोनी (सांगोला) जवळ झालेल्या भीषण अपघातात सात वारकर्‍यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना लवकरच राज्य शासनाकडून मदत दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिली.

जठारवाडी (ता. करवीर) येथील मृत वारकरी सुनीता काटे, रंजना जाधव, शांताबाई जाधव, सर्जेराव जाधव व शारदा घोडके यांच्या तसेच जखमींच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे केसरकर यांनी सांत्वन केले. जखमींवरील उपचाराचा खर्चही केला जाईल, असेही त्यांनी सांगितले

यावेळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, तहसीलदार शीतल भुमरे, प्रदीप पाटील-भुयेकर, सरपंच नंदकुमार खाडे, ग्रामसेवक द्रविड, भाजप तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील, प्रकाश खाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, पालकमंत्री केसरकर यांनी वळिवडे येथेही मृत वारकरी सुशीला पोवार व गौरव पोवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आ. ऋतुराज पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वळिवडेचे लोकनियुक्त सरपंच अनिल पंढरे यांच्या पुतणी ऋतुजा या युवतीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या घरीही केसरकर यांनी भेट दिली. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, जि. प. सदस्य महेश चौगुले उपस्थित होते.

Back to top button