कोल्हापूर : सीपीआरचे दोन लाख लिटर सांडपाणी थेट पंचगंगेत .. नियमांची पायमल्ली | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरचे दोन लाख लिटर सांडपाणी थेट पंचगंगेत .. नियमांची पायमल्ली

कोल्हापूर; एकनाथ नाईक :  सीपीआरमध्ये दररोज सर्वसाधारण दोन ते तीन लाख लिटर सांडपाणी तयार होते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी उपकरणे कालबाह्य झाल्याने एप्रिल 2022 पासून म्हणजेच तब्बल आठ महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. प्रक्रियेविना दररोज सांडपाणी जयंती नाल्यातून थेट पंचगंगेत मिसळत आहे.

सीपीआर रुग्णालयात 635 बेड आहेत. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे होतात. शस्त्रक्रिया, रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी डॉक्टरांमुळे रुग्णालयात प्रतिदिन दोन ते तीन लाख लिटर सांडपाणी तयार होते. पूर्वी रुग्णालयातील सर्वच सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगेत सोडले जात होते; पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार रुग्णालयातील जंतूमिश्रित पाणी गटारी, नदीपात्रात सोडता येत नाही. त्यामुळे सीपीआरने सन 2009 पासून पुणे येथील डेक्कन एन्व्हायर्न्मेंट कन्सल्टंट संस्थेला सांडपाणी प्रक्रिया केंद्राची जबाबदारी सोपविली होती. या प्रकल्पासाठी 26 लाख रुपये खर्च केला आहे. तीन लाख लिटर क्षमतेचा हा प्रकल्प आहे.

सांडपाण्यावर प्रक्रियेचे काम नियमित सुरू होते; पण या कंपनीने निर्जंतुकीकरणासाठी दरवाढ मागितली होती. शासनाकडून न मिळाल्याने एप्रिल महिन्यापासून कंपनीने प्रक्रियेचे काम थांबविले आहे. तसेच केंद्रातील उपकरणेदेखील कालबाह्य झाली आहेत. त्यामुळेच सीपीआरमधील सांडपाणी प्रक्रिया बंद आहे.

सीपीआरमध्ये दररोज 1000 ते 1200 बाह्यरुग्णांची नोंदणी होऊन तपासणी होते. यामधील 100 ते 150 रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखल केले जाते. तसेच 30 ते 40 छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया होतात. 25 ते 30 नियमित प्रसूती होऊन यामधील 10 ते 15 प्रसूती सिझेरियन होतात. यासह अन्य कारणांंसाठी पाण्याचा वापर होतो. यातून सुमारे 80 टक्के सांडपाणी तयार होते. जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त विविध कार्यक्रम प्रशासन आणि सामाजिक संघटनांकडून राबविले जात आहेत. पंचगंगा नदी, जिल्ह्यातील नद्या, पाणवटे प्रदूषणमुक्त चळवळ जिल्ह्यात सुरू आहे. तर दुसरीकडे सीपीआरचे सांडपाणी प्रक्रियेविना थेट नाल्यात सोडले जात आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्याची गरज

सीपीआरमध्ये नियमित उपचार घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. यामुळे सांडपाण्यात वाढ झाली आहे. सीपीआरमध्येे 1 जानेवारी 2009 रोजी सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र उभा करण्यात आला आहे. सध्या येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकच प्रकल्प आहे. त्यामुळे प्रकल्पाची व्याप्ती किंवा नवीन प्रकल्प उभा करण्याची गरज आहे.

सीपीआरच्या सांडपाणी केंद्रातील उपकरणे, वायरिंग, पाणी उपसा करणारे पंप कालबाह्य झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच पाण्याच्या टाक्यांची डागडुजी सुरू आहे. आठ दिवसांत प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होईल.
-डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता

Back to top button