दिल्ली, गोवा, चेन्नई मार्गांवर कोल्हापुरातून लवकरच विमानसेवा | पुढारी

दिल्ली, गोवा, चेन्नई मार्गांवर कोल्हापुरातून लवकरच विमानसेवा

कोल्हापूर, अनिल देशमुख : येणारे नवे वर्ष कोल्हापूरच्या विकासाचे क्षितिज आणखी मोठे करणारे ठरणार आहे. नव्या वर्षात कोल्हापूर विमानतळावरून गोवा, दिल्ली, चेन्नई या नव्या मार्गांवर विमानसेवा सुरू होणार आहे. याखेरीज कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गांवर दररोज फ्लाईट उपलब्ध होणार आहेत.

विमानसेवा विस्तारण्याची प्रचंड क्षमता कोल्हापुरात आहे. यामुळे राज्यात आणि देशांतर्गत कोल्हापूरची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

छत्रपती राजाराम महाराजांनी 1939 मध्ये सुरू केलेल्या या विमानतळाला केंद्र सरकारच्या उडान योजनेमुळे खर्‍या अर्थाने 2018 पासून गती मिळाली. यानंतर कोरोनाचे संकट दोन वर्षे राहिले, तरीही गेल्या चार वर्षांत हवाई क्षेत्रातील आपली क्षमता कोल्हापूरने सिद्ध केली आहे. या सुमारे पावणेचार वर्षांच्या कालावधीत कोल्हापूर विमानतळावरून 3 लाख 84 हजार इतक्या प्रवाशांची ये-जा झाली आहे.

नाईट लँडिंगसह 5 विमाने पार्किंगची सुविधा

कोल्हापूर विमानतळावर दि. 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू होत आहे. 1,930 मीटरपर्यंत धावपट्टीचा विस्तार झाला आहे. नव्या ‘अ‍ॅप्रन’लाही मंजुरी मिळाली आहे.

यामुळे कोल्हापूर विमानतळावर चार एटीआर आणि एक एअरबस अशा एकाचवेळी पाच विमानांचे पार्किंग करता येणार आहे. अन्य विमानतळांच्या तुलनेत पार्किंगसाठी कमी भाडे आहे. याचा मोठा फायदा विमान कंपन्यांना होणार आहे. विस्तारित धावपट्टीमुळे यापूर्वी कमी प्रवासी घेऊन जाणार्‍या विमानांना आता पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन जाता येतील.

चार राज्यांत सेवा

उडान योजनेंतर्गत चार राजधानीच्या शहरांशी जोडलेले कोल्हापूर हे एकमेव शहर होते. कोल्हापूर हे मुंबईसह तेलंगणाची राजधानी हैदराबाद, कर्नाटकची राजधानी बंगळूर, गुजरातची राजधानी अहमदाबाद तसेच देशातील प्रमुख धार्मिक ठिकाण असलेल्या आंध— प्रदेशमधील तिरुपती या मार्गाशी जोडले होते. यापैकी बंगळूर मार्गावरील सेवा सध्या बंद आहे. तसेच कोल्हापूर-हैदराबाद मार्गावरील एका कंपनीची सेवा बंद झाली आहे. या दोन्ही सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापुरातून चेन्नई, दिल्ली आणि गोवा या मार्गांसाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत. या मार्गांसाठी प्रवाशांतून मागणी आहे. यामुळे लवकरच या मार्गांवर सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. याखेरीज कोल्हापूर-शिर्डी, कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-इंदूर, कोल्हापूर-जयपूर अशाही सेवा सुरू होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर दोन विमानसेवा

कोल्हापूर-मुंबई मार्गावर सध्या आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू आहे. ती दररोज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून पुढील महिन्यापासून कोल्हापूर-मुंबई मार्गावर पाच दिवस विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या विमानसेवेची वेळही आणखी तासभर लवकर होणार आहे. त्याद़ृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याखेरीज अन्य एका कंपनीकडून या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे पुढच्या वर्षात कोल्हापूर-मुंबई मार्गावर दोन विमानसेवा उपलब्ध होतील, अशी शक्यता आहे.
कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस सेवा सुरू होती. मात्र, आता ती आठवड्यातून चार दिवस करण्यात आली आहे. या मार्गालाही प्रचंड प्रतिसाद असल्याने येत्या एक-दोन महिन्यांत ही सेवा आठवड्यातून सातही दिवस सुरू होणार आहे.

Back to top button