कोल्हापूरकरांना हुडहुडी! | पुढारी

कोल्हापूरकरांना हुडहुडी!

कोल्हापूर, आशिष शिंदे : परतीच्या पावसाने उसंत घेताच कोल्हापुरात कडाक्याच्या थंडीचा तडाखा जाणवू लागला आहे. गेल्या पाच दिवसांत किमान तापमान 22 अंशांवरून घसरून तब्बल 17 अंशांपर्यंत खाली आल्याने कोल्हापूरकरांना हुडहुडी भरली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, चार वर्षांनंतर (2018) प्रथमच कोल्हापुरात ऑक्टोबर महिन्यात 17 अंशांपर्यंत नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तसेच गेले सहा दिवस पारा 17 अंशांवर स्थिर असून, येणार्‍या आठवड्याभरात थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्यात कोल्हापुरात कमालीचे वातावरणीय बदल पाहायला मिळाले. आता थंडीचा कहर सुरू झाला असून, किमान तापमान 17 अंशांपर्यंत खाली आल्याने रात्री आणि सकाळी हुडहुडी भरू लागली आहे. रविवारी किमान तापमान 17.7 अंशांपर्यंत खाली आले होते; तर कमाल तापमान 31.2 इतके होते, यामुळे दिवसा उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.

गेल्या पाच दिवसांत कोल्हापूरचा पारा तब्बल 5 अंशांनी घसरला आहे. 20 ऑक्टोबरला किमान तापमान 22.6 होते. यानंतर थंडीची चाहूल सुरू झाली आणि 22 ऑक्टोबरला 20.5 असणारे किमान तापमान 25 ऑक्टोबरला 17.5 अंशांपर्यंत घसरल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.

Back to top button