कोल्हापूर : पर्यटनातून कोट्यवधीची उलाढाल | पुढारी

कोल्हापूर : पर्यटनातून कोट्यवधीची उलाढाल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सुट्टीच्या शेवटच्या रविवारी अंबाबाई दर्शनासह पर्यटनासाठी आलेल्या भाविक-पर्यटकांच्या मांदियाळीने जिल्हा बहरला. पर्यटन व्यवसायातून जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधीची उलाढाल झाली. रविवारी गर्दीमुळे शहरातील बहुसंख्य रस्ते गजबजले. वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला, तर पार्किंगसाठी पर्यटकांची तारांबळ उडाली.

सलग शासकीय सुट्ट्या, तसेच शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीमुळे मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक आल्याने शहर गर्दीने बहरले. साडेतीन पीठांपैकी एक असणार्‍या अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटक, भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येत आहेत. दिवाळीपासून शहरात अंबाबाई दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावत आहेत. सुट्टी संपत आल्याने रविवारी शहरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. अंबाबाई दर्शनासाठी मंदिरासह परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी भाविकांची जुना राजवाडा पोलीस ठाण्यापर्यंत रांग लागली होती. मुख्य दर्शन रांग मोठी असल्याने देवीच्या मुखदर्शनासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

विविध भागांतून आलेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे शहरात वाहनांची मोठी गर्दी झाली. पर्यटकांच्या वाहनांमुळे शहरातील प्रमुख मार्गांसह विविध चौकांत वाहतुकीची कोंडी झाली. अनेक चौकांत सिग्नलजवळ वाहनांच्या रांगा होत्या. सिग्नल मिळूनही वाहनांची रांग कमी होत नसल्याचे चित्र होते. अंबाबाई मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. महाद्वार, शिवाजी रोड, बिंदू चौक, राजारामपुरी, स्टेशन रोड आदींसह शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर मोठी वर्दळ होती. पर्यटकांच्या वर्दळीमुळे महाद्वार रोडसह विविध भाागांतील विविध दुकानांत खरेदीसाठी गर्दी झाली होती.

पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात शहरात आल्याने पर्यटकांनी रस्त्याकडेला वाहने लावणे पसंत केले. अनेक ठिकाणी पार्किंग उपलब्ध नसल्याने भाविकांना दर्शनासाठी पायपीट करावी लागली.

किल्ले पन्हाळगड हाऊसफुल्ल

पन्हाळा : किल्ले पन्हाळा पर्यटकांच्या गर्दीने गजबजला आहे. गेल्या तीन वर्षानंतर प्रथमच या दिवाळीच्या पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने पर्यटकांनी पन्हाळ्यावर हजेरी लावल्याने व्यवसायिक आनंदात आहेत.

सध्या दिवाळी सुट्टी सुरू असल्याने पर्यटक परिवारासह पन्हाळ्यात दाखल झाले आहेत. येथील नव्यानेच उभारण्यात आलेल्या शिवतीर्थ उद्यानात दिवसभर पर्यटकांची गर्दी होत आहे. तीन दरवाजा, अंधारबाव, सज्जा कोठी, तबक उद्यानातदेखील गर्दी होत आहे. लंडन बस, मुलांसाठी खास असलेली खेळणी यांचा पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत. पर्यटकांना वाहने पार्किंगसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने अनेकजण मुख्य रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्याने नागरिकांना तसेच पर्यटकांनादेखील त्रास होत आहे.

बाजीप्रभू चौक येथे असलेल्या चहाच्या टपरीमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. याबाबत पन्हाळा पालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. सज्जा कोठीकडे जाणार्‍या रस्त्यावरदेखील वाहतूक बेशिस्त असून येेथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

पावनखिंड, विशाळगडावर गर्दी

विशाळगड : निसर्गसमृद्ध आंबा गिरीस्थान, किल्ले विशाळगड आणि ’पावनखिंड’ ही ठिकाणे पर्यटकांनी गजबजू लागली आहेत. मलकापूरपासून पांढरेपाणी, पावनखिंड, भाततळी, केम्बुर्नेवाडी, गजापूर, गेळवडे धरण, विशाळगड हा तीस किलोमीटरचा तर मलकापूरपासून आंबा ते विशाळगड हा वीस किलोमीटरचा परिसर निसर्गसंपन्नतेने नटलेला आहे.

सुमारे पावणे दोन कोटी रुपयांच्या निधीतून पावनखिंडित उभारलेला वीस फुट उंचीचा स्मृतीस्तंभ, ओढयावरील पूल, पेव्हिंग ब्लॉक, पायर्‍या, पार्किंग, दोहोबाजूंना कठडे बांधल्याने पावनखिंडीचे बदललेले दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

पावनखिंड ते विशाळगड या तेरा किलोमीटरच्या मार्गावर निसर्गाची हिरवाई, दाट झाडी, नागमोडी भाततळी घाट आहे. विशाळगडावर मुंढा दरवाजा, मलिक रेहान बाबांचा दर्गाह, टकमक दरी, बाजीप्रभू व फुलाजी प्रभू बंधूंच्या समाध्या, हजारो फूट खोल दर्‍या, दुर्मिळ पक्षी या सार्‍या गोष्टी पर्यटकांना पहावयास मिळतात. हिरवागार निसर्ग आणि थंड हवा यासाठी प्रसिद्ध असलेला आंबा आणि आंबा घाट येथेही पर्यटकांची गर्दी झाली आहे.

Back to top button