

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : क्रीडानगरी कोल्हापुरात 10 कोटी खर्चून इनडोअर स्टेडियम, सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक स्पोर्टस् हॉस्टेल आणि चार कोर्टचे बास्केटबॉल संकुल उभारण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे राज्यस्तरीय सबज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत होणार्या या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी छत्रपती शहाजी लॉ कॉलेज मैदानावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, उद्योजक सचिन शिरगावकर, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वजित मगदूम, प्राचार्य जी. बी. पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आर. डी. पाटील, संजय घोडावत विद्यापीठाचे विनायक भोसले, माजी उपमहापौर संजय मोहिते, 'गोकुळ'चे संचालक बाबासो चौगुले, प्राचार्य प्रवीण पाटील, राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष धनंजय वेळूकर, शत्रुघ्न गोखले आदी उपस्थित होते.