कोल्हापूर : आल्याचीवाडीत लग्नास विरोध; महिलेची हत्या | पुढारी

कोल्हापूर : आल्याचीवाडीत लग्नास विरोध; महिलेची हत्या

आजरा; पुढारी वृत्तसेवा : आल्याचीवाडी (ता. आजरा) येथील सौ. लता महादेव परीट (वय 45) या महिलेची हत्या याच गावातील गुरुप्रसाद देवराज माडभगत (वय 24) या तरुणाने केल्याचे निष्पन्न झाले आहे. सौ. परीट यांनी आपल्या मुलीचा गुरुप्रसाद याच्याशी विवाह लावून देण्यास विरोध केल्याच्या रागातून गुरुप्रसादने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

यासाठी त्याने धारदार विळ्याचा वापर केल्याचेही कबुली जबाबात म्हटले आहे. घटना घडल्यानंतर केवळ 11 तासांत गुरुप्रसादला गजाआड करण्यात आजरा पोलिसांना यश आले.

गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता गवत आणण्यासाठी गेलेल्या सौ. परीट यांचा गळा चिरलेल्या अवस्थेतीत मृतदेह जनार्दन देसाई यांच्या शेतातील उसात आढळल्याने गवसे पंचक्रोशीत खळबळ उडाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून गुरुप्रसादला ताब्यात घेतले. गुरुप्रसादने सौ. परीट यांच्या मुलीला लग्नाची मागणी घातली होती.

यावेळी सौ. परीट यांनी गुरुप्रसाद यांना विरोध दर्शविल्याने तो त्यांच्याबद्दल मनात राग धरून होता. गुरुवारी त्या शेतात गवत आणण्यासाठी गेल्याची संधी साधून त्याने परीट यांच्यावर धारदार विळ्याने मानेवर वार केले व मृतदेह उसाचा पाला व गवत टाकून झाकण्याचा प्रयत्न केला.

परंतु स्थानिक नागरिक परीट यांच्या शोधार्थ असताना त्यांचा मृतदेह आढळला. याची माहिती मिळताच गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व स.पो.नि. सुनील हारुगडे यांनी तातडीने संशयिताची धरपकड केली. यामध्ये ही हत्या आपण केल्याची कबुली गुरुप्रसादने दिली आहे.

गुरुप्रसादला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 14 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Back to top button