‘दौलत’ कामगारांची दगडफेक | पुढारी

‘दौलत’ कामगारांची दगडफेक

चंदगड : पुढारी वृत्तसेवा : हलकर्णी येथील दौलत साखर कारखाना गळीत हंगामाच्या पहिल्याच दिवशी दिवाळी बोनससह प्रलंबित मागण्यांसाठी सुमारे 650 संतप्त कामगारांनी गेट तोडून कारखान्यात प्रवेश केला. त्यावेळी अथर्व कंपनीच्या काही मोजक्या कामगारांना मारहाण करण्यात आली. अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे व पृथ्वीराज खोराटे यांच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही कामगार गंभीर जखमी झाले.

गेल्या महिन्यात या कामगारांनी 35 दिवस संप केला होता. तेव्हा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांचा प्रश्न निकाली काढला होता. मात्र अध्यक्ष खोराटे यांनी तो पाळला नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. सोमवारी गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी सुरू होती. मात्र शिफ्टनुसार कामगार कामावर हजर झाले नाहीत. सकाळी 9 च्या दरम्यान कामगार कामावर जात असतानाच मुख्य गेट बंद करण्यात आले.

यावेळी कामगार आणि सुरक्षा यंत्रणेत वाद होताच संतप्त कामगारांनी गेट तोडून कारखान्यात प्रवेश केला. या वादात ऊस उत्पादकांचे नुकसान झाले. ऊस भरलेली सुमारे चारशे वाहने कारखान्यासमोर थांबली होती. दरम्यान वाहतुकदारही कामगारांना पाठींबा देत यामध्ये सामील झाले.

तहसीलदार विनोद रनवरे, उपविभागीय पोलिस अधीक्षक महामुनी, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, सिटू कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष जाधव, आबासो देसाई, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, गणेश फाटक, अनिल होडगे, पांडुरंग बेनके, विष्णू गावडे आदींनी कारखाना प्रशासनाबरोबर बोलणी केली. मात्र त्याला यश आले नाही. कामगार आपल्या भूमिकेवर आणि प्रशासन आपल्या मतांशी शेवटपर्यंत ठाम राहिल्याने रात्री 8 पर्यंत निर्णय झाला नाही. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राखीव पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले.

मिलचे काम अपुरे

मिलचे काम अपुरे असताना खोराटे यांनी थेट गळीत हंगामाला सुरुवात केलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत कामगार व शेतकर्‍यांमध्ये भांडणे लावण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप प्रदीप पवार यांनी केला.

12 वर्षांची आठवण ताजी

जिल्हा बँकेने थकीत कर्जपोटी हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी जप्ती पथक पाठविले होते. तेव्हा कामगारांनी बँकेच्या जप्ती पथकावर दगडफेक केली होती. 12 वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.

Back to top button