राज्य सरकार बदलल्याने थेट पाईपलाईनला विलंब : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

राज्य सरकार बदलल्याने थेट पाईपलाईनला विलंब : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सरकार बदलल्यामुळे या कामाला विलंब होत आहे, असे आ. हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सांगितले. ए. वाय. पाटील यांची नाराजी लवकरच दूर होईल, असेही ते म्हणाले. शासकीय विश्रामधाम येथे माध्यमांशी आ. मुश्रीफ बोलत होते.

दिवाळीमध्ये थेट पाईपलाईनचे काम पूर्ण होईल, असे आम्ही सांगितले होते. ते नाकारत नाही. थेट पाईपलाईनचे जवळपास 85 ते 90 टक्के काम झाले आहे. केवळ जॅकवेलचे काम पूर्ण करून काळम्मावाडी धरणातून पाणी उपसा करणे एवढेच काम राहिले आहे. दरम्यानच्या काळात सरकार बदलले. त्यामुळे या कामाला विलंब होत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

भूविकास बँकेला कर्ज वितरणासाठी एसीडीसीकडून निधी दिला होता. या रकमेला राज्य शासनाने हमी दिली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भूविकास बँकेच्या थकबाकीदारांची कर्जमाफी जाहीर केली होती. सहकार विभागाला बँकेची मालमत्ता देऊन शेतकर्‍यांचा साता-बारा कोरा करण्याचे ठरले होते. महाविकास आघाडी सरकारचाच हा निर्णय आहे, परंतु शिंदे गट व भाजपचे सरकार त्याचे श्रेय घेत असल्याची टीकाही मुश्रीफ यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोकुळचे संचालक युवराज पाटील, भय्या माने यांच्या उपस्थितीत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. गेल्या तीस वर्षांपासून पाटील यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक होईल. त्यानंतर त्यांची नाराजी निश्चितपणे दूर होईल. त्यामुळे ए. वाय. पाटील यांच्याबाबतची चर्चा पेल्यातील वादळ ठरेल, असा विश्वास आ. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Back to top button