‘गोकुळ’मुळे दूध उत्पादकांत दिवाळीचा गोडवा | पुढारी

‘गोकुळ’मुळे दूध उत्पादकांत दिवाळीचा गोडवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘गोकुळ’मध्ये आम्ही सत्तेत आल्यापासून सहावेळा खरेदी दरात वाढ केली आहे. आतापर्यंत म्हैस दुधाला 8 रुपये तर गाय दुधाला 9 रुपये इतकी ऐतिहासिक वाढ दिली आहे. दुधाला चांगला भाव मिळू लागल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या दिवाळीचा गोडवा वाढला, अशा भावना आ. हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या.

‘वसुबारस’ने शुक्रवारी दिवाळीस प्रारंभ झाला. यानिमित्त ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात आ. मुश्रीफ, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्िथतीत गाय-वासरांचे पूजन करून नैवेद्य दाखविण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

आपल्या संस्कृतीची जपणूक तसेच उत्तम पशुसंवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने ‘गोकुळ’मार्फत वसुबारस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ही चांगली गोष्ट आहे. ‘गोकुळ’ने यंदा दूध दर फरकापोटी 102 कोटी 83 लाख रुपये इतकी उच्चांकी रक्कम दूध उत्पादकांना देऊन निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण केल्याचे आ. मुश्रीफ यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीचीही जपणूक व यातून दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी ‘गोकुळ’चा नेहमी प्रयत्न असतो, असे ‘गोकुळ’चे अध्?यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाला संचालक अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, योगेश गोडबोले तसेच ‘गोकुळ’चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button