कोल्हापूर : दीपोत्सवात राबताहेत हजारो हात! | पुढारी

कोल्हापूर : दीपोत्सवात राबताहेत हजारो हात!

कोल्हापूर, सुनील सकटे : सण-उत्सव, आनंद, दु:ख अशा कोणत्याही प्रसंगात आपल्या कर्तव्यात कसूर न करता अहोरात्र सेवा बजावणार्‍या हजारो हातांनी दिवाळीतही जनसेवेचे व्रत कायम जोपासले आहे. कसलसीही आपत्ती असो अथवा सण-उत्सव अशा कोणत्याही काळात जन्म, मृत्यू, आरोग्य या सेवा अटळ असतात. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, स्मशानभूमी कर्मचारी महापालिकेचे सफाई कर्मचारी असे विविध घटक ऐन दिवाळीतही नेटाने सेवा बजावत आहेत.

अभ्यंगस्नानावेळी स्वच्छता कामगार रस्त्यावर

दिवाळी, दसरा असो अथवा अन्य कोणताही सण, या क्षणांचा आनंद लुटण्याचे भाग्य समाजातील अनेक घटकांना मिळत नाही. सणासुदीतही ड्युटी सांभाळतात. शहरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी असणार्‍या आरोग्य विभागातील झाडू कामगारांना आपल्या कामाबरोबरच सणाचा आनंद लुटावा लागतो. दिवाळीतही ही मंडळी रस्त्यावर सफाई करताना दिसतात. दिवाळीत सर्वजण अभ्यंगस्नानाच्या तयारीत असताना झाडू कामगार मात्र जनतेचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी हातात झाडू घेऊन सफाई करीत असतात.

स्मशानातच होतेय त्यांची दिवाळी

झाडू कामगारांसह महापालिकेच्या स्मशानभूमी कर्मचार्‍यांचीही हीच स्थिती आहे. स्मशानभूमीत तर चोवीस तास हात राबत असतात. मुळात स्मशानभूमीत कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचार्‍यांना भार वाहून न्यायची वेळ आली आहे. अनकेदा कर्मचार्‍यांना डबल ड्युटी करावी लागते. दिवाळीसारख्या सणातही हे कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

रुग्णसेवेतच दिवाळीचा आनंद

डॉक्टर्स, परिचारिका यांची दिवाळीही दवाखान्यांतच साजरी होते. एखाद्याची शस्त्रक्रिया असो अथवा बाळंतपण, दिवाळी आहे म्हणून हे थांबत नाही. त्यांना मृत्यूच्या सापळ्यातून वाचवून जीवदान देण्यासाठी ही मंडळी राबत असतात. महापालिका, शासकीय रुग्णालय असो वा खासगी रुग्णालय अशा प्रत्येक ठिकाणी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी हे कर्मचारी प्रयत्नशील असतात.

नागरिकांच्या संरक्षणार्थ पोलिसांची दिवाळी

अशीच स्थिती पोलिस, एस.टी. महामंडळ, विद्युत वितरण कंपनीतील कर्मचार्‍यांची आहे. पोलिस दलाची नोकरी सांभाळताना कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबास वेळ देता येत नाही. अशावेळी कुटुंबातील अन्य सदस्य सण साजरा करीत असताना घरातील कर्ता माणूस मात्र सार्वजनिक सेवेत कार्यरत असतो. दिवाळीमुळे पर्यटकांची वाढती संख्या, राजकीय नेत्यांचे दौरे, छोट्या-मोठ्या गुन्हेगारीच्या घटना आदीमुळे पोलिस कर्मचार्‍यांना दिवाळी ड्युटीवरच साजरी करण्याची वेळ येते.

दिवाळीत ‘प्रकाश’ राखत वीज कर्मचार्‍यांची दिवाळी

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. प्रत्येकाच्या घरात प्रकाश असलाच पाहिजे त्यासाठी वीज हा घटक महत्त्वाचा आहे. सणासुदीत सार्वजनिक आणि घरगुती विद्युत रोषणाईसाठी वीज कर्मचारी, अभियंते नागरिकांच्या घरी उजेड राहण्यासाठी आपली दिवाळी बाजूला ठेवून कर्तव्य पार पाडत आहेत.

एस.टी. आगारातच अभ्यंगस्नान

अशीच स्थिती एस.टी. कर्मचार्‍यांची आहे. दिवाळीत नातेवाईकांसह मित्र मंडळींना फराळ पोहोचविण्यासाठी एस.टी. महत्त्वाची आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत एस.टी. कर्मचारी एस.टी. बसमध्येच दिवाळीचा आनंद घेतात. त्यामुळे एस.टी. कर्मचारी संघटनेने अशा कर्मचार्‍यांना अभ्यंगस्नानासह फराळाची व्यवस्था आगारातच केली आहे. तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी कार्यरत असणारे अग्निशमन दलातील कर्मचारीही ऐन दिवाळीत आपले कर्तव्य बजावत आहेत. सर्वजण दिवाळी साजरी करीत असताना अग्निशमन कर्मचारी मात्र आपल्या सेवेत कार्यरत आहेत.

Back to top button