जयप्रभा स्टुडिओ प्रकरण : आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

जयप्रभा स्टुडिओ प्रकरण : आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जयप्रभा स्टुडिओप्रश्नी 250 दिवस आंदोलन सुरू असूनही शासनस्तरावर कोणताच निर्णय होत नसल्याने संतप्त आंदोलकांनी जयप्रभा स्टुडिओसमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना तत्काळ ताब्यात घेतले. यावेळी जयप्रभा स्टुडिओप्रश्नी तत्काळ निर्णय न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला.

जयप्रभा स्टुडिओची जागा विक्री झाल्यानंतर कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू झाले. याप्रश्नी तत्कालीन सांस्कृतिकमंत्री यांच्यासह खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही निवेदन देऊन याप्रश्नी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.

शुक्रवारी सकाळी जयप्रभा स्टुडिओजवळ आंदोलकांनी जमत शासन व लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी स्टेजच्या मागे काही आंदोलक हातात डिझेलचे कॅन घेऊन येताना पोलिसांनी पाहिले. हे कॅन काढून घेण्यासाठी पोलिस व आंदोलक यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी कॅन फेकून देत आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. शिवसेनेने यापूर्वीही आंदोलनात सहभाग नोंदवून जयप्रभा स्टुडिओची जागा शासनाने ताब्यात घ्यावी; अन्यथा ती चित्रपट महामंडळाला चालवण्यास द्यावी, अशी भूमिका मांडली होती. या मागणीसाठी आंदोलकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले उपस्थित होते.

दरम्यान, आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तसेच अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून नंतर सोडून दिले. या आंदोलनात रणजित जाधव, मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, बाबा पार्टे व कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यव्यापी आंदोलन करणार : यमकर

जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तत्काळ खुला झाला पाहिजे, स्टुडिओमधील इमारतीमधील खुली जागा आरक्षित राहावी व चित्रीकरण सोडून कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये, स्टुडिओचे जतन होण्यासाठी राज्य शासन आणि मनपाने लक्ष घालावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेतली जाणार नसेल; तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला.

सरकारने कोणालाही पाठीशी घालू नये : संभाजीराजे

जयप्रभा स्टुडिओ बचावसाठी गेल्या 250 हून अधिक दिवस आंदोलन सुरू आहे; पण त्याची दखल न घेतल्याने आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. जयप्रभा स्टुडिओ संपवण्याचा घाट घालणार्‍यांना सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व स्टुडिओला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news