कोल्हापूर : आदमापूर येथे मेंढी माऊलींचे आगमन; मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून घेतला विसावा | पुढारी

कोल्हापूर : आदमापूर येथे मेंढी माऊलींचे आगमन; मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून घेतला विसावा

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे संत बाळूमामा यांच्या मेंढी माऊलींचे आगमन झाले आहे. आदमापूर येथे आगमन होताच ढोल-कैताळाच्या गगनभेदी आवाजात, भंडारा उधळीत, फटाक्यांची आतषबाजीसह डॉल्बीच्या ठेक्यावर उत्साही भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. बाळुमामांच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण करुन मेंढी माऊलींनी मंदिर परिसरात विसावा घेतला.

बाळुमामा मंदिर, हनुमान मंदिर मार्गे मरगुबाई मंदिर परिसरात हा मेंढरांचा कळप स्थिरावला. मार्गावरुन बाळुमामांची पालखी जात असताना सुहासिनींनी औक्षण केले. आंबील, घुग-या, पाणी कलश घेऊन शेकडो सुहासिनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तरूणांसह वृध्दांनीही दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती. यावर्षी कारभारी लकाप्पा दुरदुंडी यांचा बग्गा नंबर पाचची मेंढी येथे आली आहे.

वाघापुर, रूकडी, तळंदगे येथील वालुंग,ओविकार मंडळानी सहभाग घेऊन ढोल वाजवित फटाक्यांची आतषबाजी केली. बाळूमामा भक्तंगण व सेवा मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळी पाडव्यादिवशी बाळूमामा यांनी सुरु केलेली लेंढी पूजन, बकरी बुजवणे हया कार्यक्रमाची प्रथा पुढे चालू ठेवण्यासाठी या मेढ्यांना येथे आणण्यात आले आहे.

महाराष्ट्र कर्नाटकामध्ये बतीस हजार मेंढी अठरा ठिकाणी कळपामधुन फिरत आहेत. काहीजण या मेंढ्यांची विनामोबदला सेवा, राखण करत आहेत. जशी बकरी पुढे फिरत जात आहेत तसा भाविकांचा लोंढा आदमापुर क्षेत्री वाढत आहे. मामांनी चालू केलेली लेंडी पूजनाची प्रथा आदमापुर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. निपाणी – राधानगरी मार्गावर कुरुकली, सुरुपली, येमगे, शिंदेवाडी, मुरगुड, निढोरी येथेही गाव वेशीवर या मेंढ्यांचे पुजन, स्वागत करण्यात आले.

हेही वाचलंत का ?

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतले केदारनाथचे दर्शन, 3400 कोटींच्या प्रकल्पांची होणार घोषणा, रोप वे चे लोकार्पण

 

 

Back to top button