इचलकरंजी : परतीच्या पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत | पुढारी

इचलकरंजी : परतीच्या पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा :  इचलकरंजी शहर व परिसरात बुधवारी परतीच्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. दिवसभर ऊन होते; मात्र दुपारी तीननंतर मुसळधार पावसाने जोर धरला. सुमारे दोन तास पावसाने झोडपून काढले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यावर विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणात स्टॉल लागले आहेत; मात्र पावसामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली.

परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. दिवाळीनिमित्त शहरात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा स्टॉल सजले आहेत. मंगळवारी दिवसभर उघडीप दिल्याने बुधवारी आणखी काही स्टॉल लागले होते. दुपारपर्यंत पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेत गर्दी होती; मात्र दुपारनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली.

खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचीही चांगलीच धांदल उडाली. राजर्षी शाहू पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांची कसरत झाली.

Back to top button