कोल्हापूर : गणपती बाप्पा मोरया! लाडक्या बाप्पांच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी | पुढारी

कोल्हापूर : गणपती बाप्पा मोरया! लाडक्या बाप्पांच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘गणपती बाप्पा मोरया, कोरोनाला हरवूया’… अशा घोषणा देत अनेकांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच गणरायाच्या मूर्ती घरी नेल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुज्ञ नागरिकांनी आवर्जून कर्तव्य बजावले. दरम्यान, शुक्रवारपासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी अवघा जिल्हा सज्ज झाला आहे.

लाडक्या बाप्पांच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवाला विविध निर्बंध असल्याने यंदाच्या गणेशोत्सवाची भिस्त घरगुती गणेशोत्सवावर आहे. घराघरांत स्वच्छता व रंगरंगोटी करून गणेशासाठी नेत्रदीपक आरास करण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, सप्तरंगी पताका, रांगोळ्यांचे सडे, आधुनिक प्रकारच्या शोभेच्या वस्तू यांनी आरास परिपूर्ण करण्यात आली आहे.

घरगुती गणेशाप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठीचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमांनुसार साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आकाराने छोटा मंडप उभारण्यात आला असून कमी प्रमाणात सुशोभीकरण केले
आहे.

दरम्यान, पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बाप्पांच्या आगमनासाठी महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम बुधवारी शहरभर राबविली. प्रशासानाच्या आवाहनानुसार लोकांनी अगोदरपासूनच मूर्ती नेण्यास सुरुवात केल्याने गणेशमूर्तींनी व्यापलेले कुंभारवाडे रिकामे होऊ लागले होते.

फळे, दुर्वा, फुले अन् पूजेचे साहित्य

गणरायाच्या पूजेसाठी आवश्यक साहित्याच्या विक्रीसाठी कुंभार गल्ली परिसरात दुकाने मांडण्यात आली आहेत. दुर्वा, फुले, खाऊची पाने, पूजेच्या साहित्यांसह अष्टगंध, अत्तर, कापूर-उदबत्ती, रुमाल, ’मोरया’ लिहिलेल्या पट्ट्या, स्कार्फ, टाळ यांसह फटाके अशा विविध प्रकारच्या वस्तूंनी परिसर सजला होता.

घरगुतीसह सार्वजनिक मूर्तीही नेल्या

प्रशासनाच्या आवाहनानुसार घरगुती गणेश मूर्तींप्रमाणेच सार्वजनिक तालीम संस्था, तरुण मंडळांनीही बुधवारपासूनच मूर्ती नेण्यास सुरुवात केली. यासाठी गंगावेस, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, मार्केट यार्ड येथे गर्दी झाली होती. पोलिस बंदोबस्त तैनात होता.

Back to top button