कोल्हापूर : गळीत हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडणार | पुढारी

कोल्हापूर : गळीत हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. यामुळे शेतातील रस्त्यांमध्ये पाणीच पाणी झाले असून, ऊसतोड करणे शक्य नाही, त्यामुळे साखर कारखाने क्षमतेने सुरू होण्यासाठी किमान पंधरा दिवस लागतील, असे यातील जाणकारांचे म्हणणे आहे.

ऊस लावणीमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन साखर आयुक्त कार्यालयाच्या वतीने 15 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानी दिली आहे; पण परतीच्या पावसामुळे हंगाम सुरू करण्यास अडचणी येत आहेत.

कारखानदारांनी गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगाम सुरू केला आहे. जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांनी ऊसतोडीही दिल्या होत्या; पण चार दिवसांपासून सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे ऊसतोडणी थांबविण्याची वेळ आली आहे. सध्या शेतात 13 महिन्यांचा ऊस उभा आहे, तोडणी झाली असल्यास शेतकर्‍यांना त्याचा फायदा होऊ शकतो; पण पावसाचा परिणाम ऊसतोडणीवर होत आहे. जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांकडे 180 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे; पण पावसामुळे हंगाम लांबत चालला आहे.

कारखान्यांची तयारी

पावसामुळे ऊसतोडणी कामगारांना बसून राहावे लागत आहे. हे कामगार बसून असल्यामुळे कारखान्यांना त्या कामगारांची जेवणाची सोय करावी लागत आहे. प्रत्येक कारखान्यास दिवसाला जवळपास एक ते दीड लाख रुपये खर्च भागवावा लागत आहे.

पावसाने ऊस लावण हंगामही लांबणीवर!

हमीदवाडा, पुढारी वृत्तसेवा : परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. दररोज हजेरी लावणार्‍या या पावसाने ऊस लावण हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे.

परतीच्या पावसाच्या नित्य हजेरीने सोयाबीन व भात मळणीमध्ये तर अक्षरशः धांदल उडाली आहे. या मळणीचा चिखल होत आहे. पीक वाळवायचे लांबच; पण कोरड्या अंगी ते पोत्यात भरून घरी कसे आणायचे, ही समस्या आहे.

आता पडणारा पाऊस ढगफुटीप्रमाणे पडत आहे. यामुळे नदीची पातळीदेखील चांगलीच वाढत आहे. या पावसाने रानात कमालीची ओल झाली आहे. त्यामुळे शाळू, हरभरा, गहू या रब्बी पिकांची तसेच सुरू ऊस हंगामाची लावणदेखील पुढे जात आहे.

पावसाळ्याअगोदर सोयाबीनसाठी सर्‍या काढून ठेवल्या आहेत. त्या सर्‍या आता पाण्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे उसाची कांडी असो की, रोपे लावणे ही कामे आता पूर्णत: ठप्प झाली आहेत. चांगली घात आल्याशिवाय हे काम शक्य नाही व पाऊस थांबल्याशिवाय घात कशी येणार? हा प्रश्न आहे.

अनेक कृषिपंप बुडाले

वेदगंगा नदीचे पाणी इतके वाढले की, दोन दिवसांपूर्वी काही तास हे पाणी पात्राबाहेरदेखील आले. आता पूर येणे शक्य नाही व पाऊसदेखील थांबल्याने मध्यंतरी अनेकांनी आपले कृषिपंप नदीवर बसवले; मात्र वाढलेल्या पाणी पातळीमुळे हे पंप बुडाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Back to top button