कोल्हापूर : वैभव पाटीलसह पत्नीची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया | पुढारी

कोल्हापूर : वैभव पाटीलसह पत्नीची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील सर्वात मोठी कमांडोज् मॅरेथॉन स्पर्धा अशी भलावण करून देशातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धकांची लाखो रुपयांची फसवणूक केलेल्या वैभव पाटीलसह पत्नी पूनम पाटीलची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिसांनी सुरू केली आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेसह कुडित्रे (ता. करवीर) परिसरातील एका बँक व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यात आला आहे. फसवणूक प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा संशय आहे. मोबाईल कॉल डिटेल्स आधारे संबंधितांचा शोध घेण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.

फसगत झालेल्या स्पर्धकांनी कागदपत्रांसह तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन तपास अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी केले आहे. मुख्य आयोजकाने केलेल्या आत्महत्येमुळे त्याची पत्नी, संशयित पूनम पाटील बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर तिच्याकडे चौकशी करण्यात येईल. त्यानंतर फसवणूक प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती उघड होईल, असेही त्यांनी सांगितले.

कमांडोज् मॅरेथॉन स्पर्धेचा भूलभुलैय्या दाखवून वैभव पाटील याने महाराष्ट्रासह देशभरातील साडेचार हजारांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकलेल्या स्पर्धकांकडून प्रवेश शुल्कच्या नावाखाली मोठमोठ्या रकमा उकळून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. स्पर्धेपूर्वी मुख्य आयोजक वैभव पाटील शहरातून अचानक गायब झाल्याने शेकडो स्पर्धकांनी न्यू शाहूपुरी येथील कार्यालयासह शाहूपुरी पोलिस ठाण्यात गर्दी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

नेमक्या किती स्पर्धकांना घातला गंडा?

प्रकरण अंगलट आल्याने तसेच पोलिस कारवाईच्या धास्तीने वैभव पाटील याने तिरपण ( ता. पन्हाळा) येथील घराजवळील शेतवडीत गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. वैभवसह साथीदारांनी स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या किती स्पर्धकांची फसवणूक केली, याचा अद्यापही पोलिसांना अंदाज आला नाही, असेही सांगण्यात आले.

आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी पत्र

शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेतील खात्यावर केवळ जुजबी रक्कम दिसून येते. तर करवीर तालुक्यातील कुडित्रे परिसरातील एका स्थानिक बँकेतील खात्याचीही सायंकाळी पोलिसांना माहिती मिळाली आहे. तपास अधिकार्‍यांनी तत्काळ व्यवस्थापनाशी संपर्क साधून सर्व आर्थिक व्यवहार थांबविण्याचे पत्र दिले आहे.

मर्जीतील साथीदारांचाही लवकरच छडा

कमांडोज् मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यामागे वैभव, पत्नी पूनमसह त्यांच्या काही मर्जीतील काही साथीदारांचाही समावेश असावा, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे. संबंधितांचा छडा लावून त्यांचीही बँक खाती गोठवण्याचा निर्णय तपास अधिकार्‍यांनी घेतला आहे. साखळीतील व्यक्तींची माहिती असल्यास नागरिकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. फसगत झालेल्या स्पर्धकांनी कागदपत्रांसह तक्रारीसाठी पुढे यावे, असेही इंगवले यांनी सांगितले.

Back to top button