भेसळयुक्त खव्यापासून सावधान! | पुढारी

भेसळयुक्त खव्यापासून सावधान!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत भेसळीच्या प्रकारात वाढ झाली आहे. मिठाईची मागणीत झालेली वाढ लक्षात घेवून खव्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन ठोस पावले उचलणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात मिठाईची छोटी-मोठी 1 हजारहून अधिक दुकाने आहे. दररोज सुमारे एक ते दीड हजार किलो तर सणात दोन ते अडीच हजार किलो खव्याची मागणी असते. भेसळीच्या खव्यामुळे घसा दुखणे, आवाज बसणे, पोटाची पचनक्रीया बिघडणे असे आजार उद्भवतात.
दुधाच्या वाढत्या दरामुळे खवा माफियांनी दुध पावडरीला पसंती दर्शविली आहे. भेसळीचा खवा तयार करण्याचा हा खेळ रात्रीचा सुरू असतो. रात्री भेसळयुक्त खवा बनविण्यासाठी भट्ट्या पेटतात. भल्या पहाटे खवा मिठाईवाल्यांना पोहोच केला जाते.

सांगली, कर्नाटकातून आवक

जिल्ह्यात सणासुदीत प्रामुख्याने बनावट खव्याचा पुरवठा सांगलीसह कर्नाटक राज्यातून होतो. निकृष्ट दर्जाच्या दूध पावडरचा वापर करून हा खवा तयार केला जातो. एक किलो दूध पावडपासून साधारण दोन किलो खवा तयार केला जातो. त्यामध्ये पाणी, वनस्पती तुपाचा, रताळी यांचा वापर केला जातो.

गेल्यावर्षी शिरोळमध्ये झाली होती मोठी कारवाई

गतसाली शिरोळ तालुक्यातील खवा बनवणार्‍या भट्टींवर पुणे येथील अन्न व औषध प्रशासाने धाडी टाकल्या होत्या. यामध्ये सुमारे 20 लाख रूपये किंमतीचा खवा जप्त करून तो नष्ट करण्यात आला होता. शिरोळसह शाहूवाडी, करवीर, हातकणंगले, कागल, राधानगरी, पन्हाळा, गडहिंग्लज तालुक्यातून देखील खव्याची आवक होते.

…असा ओळखा शुद्ध खवा

अन्न मानक आणि सुरक्षा प्राधिकरण यांनी सांगितल्यानुसार एक चमचा खवा घ्यावा. तो एक कप गरम पाण्यात मिसळावा. नंतर कपामध्ये आयोडीनचे काही थेंब टाकावेत. आयोडीन टाकल्यानंतर गरम पाण्यात मिसळलेला खवा जर निळा झाला तर त्यात स्टार्टची भेसळ झाली आहे हे समजावं. आणि तसं झालं नाही तर खवा शुध्द, सुरक्षित आहे असे समजावे.

Back to top button