कोल्हापूर : सीपीआरमधील ’ती’ लिफ्ट बंद; बॅटरी, जनरेटर सप्लायमध्ये बिघाड | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरमधील ’ती’ लिफ्ट बंद; बॅटरी, जनरेटर सप्लायमध्ये बिघाड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सीपीआरमध्ये रुग्णांसह डॉक्टरांना वॉर्डांत ये-जा करण्यासाठी एकूण 6 लिफ्ट आहेत. यामधील एक लिफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, तर रविवारी सीपीआरच्या तुळशी इमारतीमधील लिफ्टच्या जनरेटर व बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत सप्लाय झाला नाही. त्यामुळेच लिफ्ट बंद पडली. रविवारी हा प्रकार घडला. या लिफ्टमध्ये काही वेळ डॉक्टर अडकून पडले होते. त्यामुळे ती लिफ्ट बंद ठेवण्यात आली आहे. सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांसोबत अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी सर्व लिफ्टची पाहणी केली. दुरुस्तीनंतर लिफ्ट सुरू केली जाईल, अशी माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.

सीपीआरमधील वॉर्डांमध्ये वर-खाली ये-जा करण्यासाठी रुग्णांसह डॉक्टर, कर्मचारी यांच्यासाठी लिफ्टची सोय आहे. येथे एकूण 6 लिफ्ट आहेत. त्यापैकी 4 सुरू असून, त्यामधून रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी यांची ये-जा सुरू आहे. सीपीआरमधील लिफ्टची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागातील इलेक्ट्रिक विभागाकडे आहे. या विभागाने या देखभालीची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे दिली आहे. असे असताना तुळशी इमारतीमधील लिफ्ट लाईट गेल्यानंतर मध्येच का थांबली.

जनरेटर, बॅटरी बॅकअप का घेतला नाही, याची सखोल चौकशी करा; अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडली, तर तुम्हाला जबाबदार धरू. हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक महिन्याला सर्वच लिफ्टची तपासणी करून वापरायोग्य आहेत का? असा लेखी रिपोर्ट द्यावा, असे सांगून अधिष्ठाता डॉ. दीक्षित यांनी खासगी कंपनीच्या कर्मचार्‍यांची कानउघाडणी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इलेक्ट्रिक इंजिनिअर रणजित चकोटे उपस्थित होते.

लिफ्टमधून ये-जा टाळली

लिफ्टमध्ये डॉक्टर अडकल्याची माहिती वार्‍यासारखी सीपीआरमध्ये पसरली. त्यामुळे सोमवारी डॉक्टर, रुग्ण, नातेवाईकांसह अन्य कर्मचार्‍यांनी अन्य वॉर्डांतील लिफ्टचा वापर टाळला. त्यांनी जिन्यावरून ये-जा केली. लिफ्ट बंदची धास्ती सीपीआरमधील सर्वांनीच घेतली आहे.

Back to top button