कोल्हापूर : दिवाळी झाल्यानंतर तसलमात देणार काय? | पुढारी

कोल्हापूर : दिवाळी झाल्यानंतर तसलमात देणार काय?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महागाई भत्ता आणि दिवाळीसाठी तसलमात लवकरच देण्याच्या अटीवर महापालिका कर्मचारी संघाने संप मागे घेतला. परंतु, चार दिवस उलटले तरीही त्याची रक्कम अद्याप कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही. दिवाळी चार दिवसांवर आली आहे. परिणामी, दिवाळी झाल्यावर महागाई भत्ता आणि तसलमात देणार काय? असा संतप्त सवाल कर्मचार्‍यांतून उपस्थित केला जात आहे.

दिवाळीसाठी कायम वर्ग-3 कर्मचार्‍यांना 4 हजार रु., वर्ग-4 मधील कर्मचार्‍यांना 12 हजार 500 तसलमात देण्याचे प्रशासन आणि कर्मचारी संघाच्या बैठकीत ठरले आहे. रोजंदारी कर्मचार्‍यांना 6 हजार रु. तसलमात दिली जाणार आहे. दिवाळीनंतर सलग दहा महिन्यांत तसलमातची ही रक्कम कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात करून घेतली जाणार आहे.

सातव्या वेतन आयोगातील 11 टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे. कर्मचार्‍यांना सुमारे 7 ते 20 हजार इतका हा फरक मिळणार आहे. परंतु, अद्याप ही रक्कम कर्मचार्‍यांना मिळालेली नाही. किमान सोमवारी तरी रक्कम मिळेल, या आशेवर कर्मचारी होते. त्यानंतर दिवाळी खरेदीची धामधूम सुरू केली जाणार होती. मात्र, सोमवारी रक्कम न मिळाल्याने कर्मचार्‍यांतून नाराजी व्यक्त केली जात होती. रक्कम मिळणार कधी? दिवाळीची खरेदी करायची कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

केएमटी कर्मचार्‍यांचा संप मागे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पगारातून कपात केलेली रक्कम आणि रोजंदारी कर्मचार्‍यांना दिवाळीसाठी प्रत्येकी 5 हजार रु. तसलमात देण्याबरोबरच केएमटी कर्मचार्‍यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याने 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला. म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनने त्यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 3 ऑक्टोबरला संपाची नोटीस दिली होती.

प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, परिवहन व्यवस्थापक टीना गवळी आणि युनियनच्या वतीने अध्यक्ष निशिकांत सरनाईक, उपाध्यक्ष विश्वनाथ चौगुले, नीलेश डोईफोडे आदींच्या बैठकीत मागण्यांविषयी तोडगा निघाला. दिवाळीपूर्वी पगार देणे. प्रलंबित पगारातील दोन महिने कपात केलेली प्रत्येकी 25 टक्के रक्कम त्वरित देणे.

केएमटीतील रोजंदारी कर्मचार्‍यांना प्रत्येकी 5 हजार रु. तसलमात व कंत्राटी कर्मचार्‍यांना त्यांच्या पगारातील फरकाची रक्कम देणे. सातव्या वेतनाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविणे यासह इतर मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत.

युनियनचे कार्याध्यक्ष अनिल बोरचाटे, जनरल सेक्रेटरी आनंदा आडके, खजानिस अंकुश कांबळे, जे. एस. फाले आदींसह इतर बैठकीत सहभागी होते.

Back to top button