कोल्हापुरात पाच तास धुवाँधार | पुढारी

कोल्हापुरात पाच तास धुवाँधार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सलग दोन दिवसांनंतर एक दिवसाची विश्रांती घेत पावसाने शुक्रवारी कोल्हापूर शहराला पुन्हा झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह दुपारी सुरू झालेल्या पावसाची सुमारे पाच तासहून अधिक काळ धुवाँधार वृष्टी सुरू होती. हातकणंगले परिसरात मुसळधार पाऊस झाला.

पावसाने अनेक भागात पाणी साचले. जनजीवन विस्कळीत झाले. शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे हातातोंडाशी आलेली हजारो हेक्टरमधील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर पाल घाटात सायंकाळी दरड कोसळली. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी, भुदरगडसह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जणू तळच ठोकला आहे. कोल्हापूर शहरात तर काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. सलग दोन दिवस ढगफुटीसद़ृश पाऊस झाल्यानंतर गुरुवारी पावसाने पूर्ण उघडीप दिली. यामुळे परतीचा पाऊस गेला, असा समज शुक्रवारी खोटा ठरला. दिवसभर उघडीप होती. दुपारी तीनच्या सुमारास अचानक वातावरण ढगाळ झाले. सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या. मात्र सायंकाळी चारनंतर काही मिनिटांतच वातावरण काळेकुट्ट झाले आणि पावसाचा जोरही वाढला.

सायंकाळी काही काळ पावसाचा जोर कमी झाला. सायंकाळी साडेसातनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. ढगांच्या गडगडाटात रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळतच होता.

यंदा निर्बंधमुक्त वातावरणात सण-समारंभ साजरे होत आहेत. त्यामुळे यंदा तरी चार पैसे मिळतील या अपेक्षेने व्यापारी, फेरीवाले, लहान व्यावसायिक यांनी प्रसंगी कर्ज काढून विक्री साहित्याची जु???ळवाजु?ळव केली आहे. दिवाळीसाठी कपडे, फराळ साहित्य, सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी या काळात ग्राहकांची गर्दी होते. परंतु या आठवड्यातील सततच्या पावसाने खरेदीवर परिणाम झाला आहे.

विक्री साहित्य ठेवले गुंडाळून

शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोडवर शुक्रवारीही शुकशुकाटच होता. सायंकाळी पावसाला सुरुवात होताच फेरीवाल्यांना आपले साहित्य गुंडाळून ठेवावे लागत आहे. रांगोळी, आकाशकंदील, पणत्यांचीही विक्री झाली नाही.

प्रवाशांचीही धांदल

पावसामुळे प्रवाशांचीही धांदल होत आहे. शहरात अनेक ठिकाणी केएमटीच्या बसथांब्यांवर शेडची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना भर पावसातच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.भाऊसिंगजी रोडवर केएमटी बंद पडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.

पादचार्‍यांचा प्रवास घाण पाण्यातून

पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. चिमासाहेब चौक, जोतिबा रोड, बिंदू चौक, व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, शाहूपुरी पोलिस ठाणे, ताराराणी चौक, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी जनता बाजार चौक, बाबूभाई परिख पूल आदी ठिकाणी साचलेल्या पाण्याचा त्रास पादचार्‍यांना होत होता. या घाण पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत होती.

Back to top button