शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात 450 कोटींचे प्रोत्साहन अनुदान | पुढारी

शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात 450 कोटींचे प्रोत्साहन अनुदान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नियमित कर्ज परतफेड करणार्‍या एक लाख 29 हजार 260 शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात अनुदानापोटी सुमारे 450 कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. येत्या दि. 20 पासून हे अनुदान जमा करण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी पात्र लाभार्थी शेतकर्‍यांची दुसरी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारी (दि. 20) सुरू होणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे व लीड बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे उपस्थित होते.

पहिल्या टप्यात 1 लाख 29 हजार 260 शेतकर्‍यांना हे अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी पात्र शेतकर्‍यांची संख्या जिल्ह्यात 1 लाख 75 हजारपर्यंत असण्याची शक्यता आहे. उर्वरित शेतकर्‍यांची यादी राज्य शासनाकडून 1 नोव्हेंबरनंतर जाहीर केली जाणार आहे.

नियमित कर्ज फेडणार्‍यांत जिल्ह्यातील 12 टक्के शेतकरी

राज्यात नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 14 लाख आहे. त्यापैकी सुमारे 1 लाख 75 हजार शेतकरी हे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत सुमारे 12 टक्के आहे. राज्यात नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांची सर्वाधिक प्रमाण असावे असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

Back to top button