

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीमध्ये इंग्लंडला मागे टाकून पाचवे स्थान मिळविण्याच्या स्पर्धेत अवघ्या 10 बिलियन डॉलर्सनी संधी हुकण्याची वेळ आलेल्या भारताला आगामी काळामध्ये उज्ज्वल भवितव्य आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेल्या जागतिक आर्थिक पाहणी अहवालात भारताची घोडदौड कायम राहण्याचे संकेत दिले असून 2028-29 या आर्थिक वर्षामध्ये भारत, इंग्लंड, जर्मनी आणि जपान या तीन आर्थिक महासत्तांना मागे टाकून तिसर्या स्थानावर स्थानापन्न होईल, असे अनुमान व्यक्त केले आहे.
अलीकडेच ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात गत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च 2022) भारताने इंग्लंडला मागे टाकून पाचवे स्थान पटकाविल्याचे मत नोंदविले होते. ब्लूमबर्गचे हे विश्लेषण जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या तिमाहीच्या माहिती आधारे केले होते. या तिमाहीच्या आकडेवारीत भारताने इंग्लंडला मागेही टाकले होते. परंतु, वार्षिक आकडेवारीचा आधार घेता भारताची ही संधी अवघ्या 10 बिलियन डॉलर्सनी हुकल्याचे स्पष्ट झाले. तथापि, नाणेनिधीने अहवालात सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (जीडीपी) वाढ आणि क्रयशक्ती तूल्यता सिद्धांताआधारे केलेल्या भविष्यातील विश्लेषणात भारताची घोडदौड कायम राहण्याचे संकेत दिले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताला पाच लाख कोटी डॉलर्स आकारमानाची अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष घोषित केले होते. याचा वेध घेतला, तर 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान 3.18 ट्रिलियन डॉलर्स इतके राहिले. याचवेळी जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान 3.19 ट्रिलियन डॉलर्स इतके होते; मात्र नव्या पाहणीत मात्र चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान 3.47 ट्रिलियन डॉलर्सवर जाईल आणि 3.2 ट्रिलियन डॉलर्स आकारमान असणारी ब्रिटनची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर ढकलली जाईल, असे अहवालात नमूद केले आहे.
भारत हा जगाच्या लोकसंख्येच्या आघाडीवर चीनपाठोपाठ दुसर्या क्रमांकाचा देश असला, तरी जगाच्या एकूण भूभागाच्या तुलनेत भारताचा वाटा अवघा 2.4 टक्के आहे. एवढ्या चिमुकल्या देशाचे नाणेनिधीने मांडलेले आर्थिक प्रगतीचे चित्र काही सिद्धांतावर आधारित आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न, महागाई निर्देशांक, क्रयशक्ती अशा अनेक परिमाणांआधारे सिद्धांतांच्या कसोटीवर हे विश्लेषण मांडले जाते. यामध्ये काही ठिकाणी जागतिक अर्थव्यवस्थांच्या आकारमानात कमी फरक दिसतो. यामुळे नाणेनिधीच्या निरीक्षणाप्रमाणे भारत 2028 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत तिसर्या स्थानावर स्थानापन्न होण्याचे अंदाज काही अंशी मागेपुढे होईलही, असे तज्ज्ञांचे मत असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ही सकारात्मक आणि गतीने सरकते आहे, यावर मात्र कुणाचे दुमत नाही.