कोल्हापूर : 10 तोळे दागिने निवृत्त शिक्षकाला परत | पुढारी

कोल्हापूर : 10 तोळे दागिने निवृत्त शिक्षकाला परत

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने निवृत्त शिक्षकाचे टेन्शन वाढलेले… पत्नीचे दागिने गहाण ठेवून हप्ते नियमित करण्यासाठी तारांबळ उडालेल्या शिक्षकाकडील साडेचार लाख रुपये किमतीचे 10 तोळे दागिने अचानक हरविल्यानंतर त्यांची काय मानसिक अवस्था झाली असेल… नेमके त्याचे प्रत्यंतर करवीर पोलिसांना गुरूवारी अनुभवाला आले. पोर्ले (ता. पन्हाळा) येथील तरुण दाम्पत्यामुळे संकटात सापडलेल्या शिक्षकाचा जीव भांड्यात पडला. करवीर पोलिसांच्या मदतीने दाम्पत्याने संबंधित शिक्षकाचा शोध घेऊन त्यांचे दागिने परत केले.

नवीन वाशी नाका येथील तानाजी भिवाजी देसाई (वय 62) हे निवृत्त शिक्षक. बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा मासिक हप्ता थकल्याने देसाई कुटुंब चिंतेत होते. त्यांनी घरातील 10 तोळे दागिने बँकेत तारण ठेवून त्यावर दोन लाखांचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला. दोन प्रतिज्ञापत्रे व 10 तोळ्यांचे दागिने रूमालात बाधून हा ऐवज दुचाकीच्या डिकीत ठेवण्यात आला. शिक्षक देसाई हे जिवबानाना पार्क येथील रस्त्यावरून वाहनाने गडबडीत जात असताना डिकीतील दागिने व प्रतिज्ञापत्र एमएसईबी रोडवर पडले. काही वेळाने पोर्ले येथील तरुण व्यावसायिक विशाल तानाजी मोरे (वय 35) यांना या वस्तू बेवारस स्थितीत आढळून आल्या.

मोरे यांनी रूमाल उचलला. गाठ सोडल्यानंतर काय आश्चर्य… त्यात लखलखते सोनं.. दोन मोतीहार, दोन गंठण, ब—ेसलेट असा 10 तोळ्याचा ऐवज… मोरे यांनी पत्नी हर्षदा यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. हर्षदा स्वत: घटनास्थळी दाखल झाल्या. प्रतिज्ञापत्रावरील नाव आणि मोबाईल क्रमांकांवरून देसाई यांचे निष्पन्न झाले. मोरे यांनी चार ते पाचवेळा देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळत नव्हता.

मालकाच्या शोधासाठी दवंडी!

मोरे दाम्पत्य करवीर पोलिस ठाण्यात दाखल झाले. प्रभारी अधिकारी सूरज बनसोडे, विक्रम चव्हाण, हवालदार दत्तात्रय बांगर, सुनील देसाई यांच्याशी त्यांनी संपर्क केला. दाम्पत्यांच्या प्रामाणिकपणावर अधिकारी, पोलिस खूश झाले. त्यांनी पती-पत्नीचे कौतुक करून जिवबा नाना पार्क परिसरात सायंकाळी दवंडीही दिली. त्यानंतर देसाई भेदरलेल्या स्थितीत पोलिस ठाण्यात आले.

Back to top button