कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना मुहूर्त कधी? | पुढारी

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना मुहूर्त कधी?

कोल्हापूर, सुनील सकटे : जिल्ह्यात पुणे-बेंगलोर, कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी-नागपूर, आजरा-आंबोली-बेळगाव असे चार राष्ट्रीय महामार्ग आहेत. या चारही महामार्गांच्या चौपदरीकरण आणि विस्तारीकरणाची कामे वर्षभरापासून खोळंबली आहेत. आता तरी या कामांना मुहूर्त मिळणार का, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

जिल्ह्यात केवळ पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात होता. या महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर कोल्हापूर- रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाली. त्यानंतर कोल्हापूर – गगनबावडा आणि आजरा -आंबोली- बेळगाव या राज्यमार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले. जिल्ह्यात तीन नवे महामार्ग जाहीर झाले असले, तरी यापैकी एकही रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या नियमावलीनुसार तयार केला गेलेला नाही. त्यामुळे केवळ नावापुरतेच महामार्ग राहिले आहेत.

महामार्ग झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागास या रस्त्यावर निधी खर्च करता येत नाही आणि किरकोळ कामांसाठी केद्र सरकारकडून निधीची शक्यता कमी अशा कात्रीत हे मार्ग सापडले आहेत. आता निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण आहे. केवळ वर्क ऑर्डर काढण्यात होणारी चालढकल महामार्ग विस्तारीकरणात अडथळा बनली आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर आहे; मात्र गेले तीन ते चार वर्षे केवळ भूसंपादनात काम थांबले आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णत्वास आली असली, तरी अद्याप पुढील प्रक्रिया झालेली नाही. गगनबावडा -कोल्हापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 350 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला, तरी अद्याप या कामाची वर्क ऑर्डर दिलेली नाही.

आंबोली-आजरा महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी सुमारे 500 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही केवळ वर्क ऑर्डरसाठी या रस्त्याचे काम रखडले आहे. शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्क ऑर्डरसाठी काम का थांबले, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. एवढेच नाही, तर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गातील कागल-सातारा या अंतरासाठी तीन हजार कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यातील महामार्गांच्या विस्तारीकरणाच्या सर्व कामांसाठीही आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा संतप्त सवाल केला जात आहे.

Back to top button