कोल्हापूर : दसरा चौकात दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी | पुढारी

कोल्हापूर : दसरा चौकात दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रिक्षा थांबविण्याच्या कारणावरून दसरा चौकात दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी घडली. काठ्या, दगड घेऊन तरुण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. भररस्त्यावर सुरू असलेल्या या हाणामारी सुरू असल्याने नागरिक, वाहनधारकांमध्येही गोंधळ उडाला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला. हाणामारीचे व्हिडीओ दिवसभर व्हायरल होत होते. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.

फिर्यादी हरी अशोक सुतार हे दसरा चौकातील सुतारवाड्यामध्ये राहतात. संशयित शिवाजी साळोखे हे रिक्षा घेऊन त्या ठिकाणी आले होते. हरी सुतार यांनी त्यांना ‘थोडे थांब’ असे म्हटल्याच्या रागातून दोघांत वाद झाला. हरी सुतार यांच्यासोबतही त्यांचा चुलतभाऊ शुभम सुतार, सुरेश सुतार थांबलेले होते.

शिवाजी साळोखे याने रोहित साळोखे, स्वप्निल साळोखे, नीलेश साळोखे, विशाल साळोखे (सर्व रा. सोमवार पेठ) यांना बोलावून घेतले. या पाचजणांनी हातातील काठी, लोखंडी पट्टी, दगड घेऊन सुतार यांच्यावर चाल केली. भररस्त्यात ही हाणामारी सुरू होती. याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन जमाव पांगवला.

Back to top button