कोल्हापूर : चिनी मालावर बहिष्कार, भारतीय वस्तूंना मागणी | पुढारी

कोल्हापूर : चिनी मालावर बहिष्कार, भारतीय वस्तूंना मागणी

कोल्हापूर, सचिन टिपकुर्ले : व्यापार संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने चिनी मालावर बहिष्कार घालण्याच्या केलेल्या आवाहनामुळे चिनी निर्यातदारांना दिवाळीच्या हंगामात व्यवसायात 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ‘कॅट’ने यावर्षीही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. यासाठी देशातील काही शहरांतील सर्व्हे केला आहे. या वीस शहरांनी दिवाळीसाठी चीनमधून कोणत्याही मालाची मागणी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे दिवाळी सणाच्या काळात चीनमध्ये सुमारे 50 हजार कोटी रुपयांची व्यापारी तूट होणार आहे.

कोरोना काळात भारत-चीन वाद आणखी विकोपाला गेला होता. याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’वर अधिक भर देण्याचे आवाहन केले होते. ‘कॅट’ला केंद्र सरकारने केलेल्या आवाहनानंतर चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केली. याला गतवर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. काही वस्तूंची देवाण-घेवाणही होते. यात मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधील पार्टस् यांचा समावेश होतो.

पूर्वी ग्राहकांकडून दिवाळी कालावधीत आकाश कंदील, लाईट माळा, फोकस, पणती, फटाके, प्लास्टिक बंदूक यांना मागणी असायची; पण या सर्व वस्तू भारतीय बनावटीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चिनी मालाची फारशी विक्री होताना दिसत नाही. चिनी मालाची जागा आता भारतीय वस्तूंनी घेतली आहे.

‘कॅट’कडूनही याबाबत काही शहरांचा सर्व्हे करण्यात आला. यात नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर, लखनौ, चंदीगड, रायपूर, भुवनेश्वर, कोलकाता, रांची, गुवाहाटी यांचा समावेश आहे. दिवाळी सणासाठी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ऑर्डर दिली जाते; पण आतापर्यंत दिवाळीच्या वस्तू, फटाके किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी भारतीय व्यापारी किंवा आयातदारांनी चिनी निर्यातदारांना ऑर्डर दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिनी वस्तूंची मागणी घटली : पाटील

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव व नवरात्रौत्सवात चिनी वस्तू दिसल्या नाहीत. आता दिवाळीतही भारतीय बनावटीचे आकाश कंदील, लाईट माळा, फटाक्यांना मागणी आहे. चिनी बनावटीच्या वस्तूंची मागणी दोन वर्षांपासून चांगलीच घटली आहे, असे ‘कॅट’चे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

Back to top button