साखर हंगामाला पावसाचा खोडा!

साखर हंगामाला पावसाचा खोडा!
Published on
Updated on

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : देशाच्या साखर कारखानदारीमध्ये नव्या हंगामाला प्रारंभ करण्याची लगीनघाई सुरू असताना परतीच्या पावसाने यामध्ये विघ्न उभे केले आहे. उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ आणि पाठोपाठ महाराष्ट्रात हवामान खात्याने ऊस लागवड क्षेत्रात पावसाचा दिलेला रेड आणि ऑरेंज अलर्टमुळे हंगाम सुरू होण्यास विलंब तर होतो आहेच. त्याचसोबत ढगफुटीसद़ृश पावसाने अनेक ठिकाणी ऊस उत्पादन आणि साखरेचा उतारा यांच्यापुढेही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणारा वरुणराजा परतीच्या प्रवासात किती उपद्रव मूल्य दाखवतो, यावर कारखानदारीच्या अर्थकारणाची गती अवलंबून राहणार आहे.

साखर हंगामाचा उत्तरेकडे 1 ऑक्टोबरला, तर दक्षिणेकडे 1 नोव्हेंबरला बिगुल वाजतो. दसर्‍याचे सीमोल्लंघन उरकले की, कारखान्याचे बॉयलर पेटू लागतात आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हंगाम गतिमान होऊ लागतो. गतवर्षी देशात गाळपासाठी ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता आणि हंगाम थोडा उशिरा सुरू झाल्याने हंगामाच्या उत्तरार्धात काही ठिकाणी शिल्लक उसाचे गाळप कसे करायचे, असा प्रश्न साखर कारखानदारीपुढे होता.

महाराष्ट्रासारख्या साखरेची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज्यामध्ये मराठवाड्यातील शिल्लक उसाचे गाळप करण्यासाठी राज्य सरकारवर कारखान्यांना अनुदान देण्याची वेळ आली होती. अनुदान देऊनही ऊस शिल्लक राहणार, अशी भीती होती. त्यामुळे नव्या हंगामात 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. यापूर्वी कारखाने सुरू करणार्‍या व्यवस्थापनांना दंड करण्याची भूमिका साखर आयुक्तालयाने घेतली; पण या गाळपात परतीच्या पावसाने खोडा घातला आहे.

महाराष्ट्रात परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत बरसत राहील, असे हवामान खात्याचे मत आहे आणि पाऊस पूर्णपणे परतल्यानंतर जमीन वाळण्यासाठी व उभ्या उसाला ऊन खाण्यासाठी किमान 10 ते 15 दिवसांचा कालावधी लक्षात घेतला, तर राज्यातील हंगाम 1 नोव्हेंबरलाही पूर्ण क्षमतेने सुरू होईल की नाही, याबाबत शंका आहे. याचे विभागवार विश्लेषण केले, तर कोल्हापूर विभागात गाळपासाठी अडचणी येणार नाहीत; पण पुणे, सोलापूर आणि मराठवाड्यामध्ये गाळप क्षमता आणि उपलब्ध ऊस यांचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

देशामध्ये गतहंगामात 497 साखर कारखाने सहभागी झाले होते. या कारखान्यांमध्ये इथेनॉलनिर्मितीसाठी वळविलेली 34 लाख 2 हजार टन साखर वगळता 360 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या हंगामात 55.83 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा होता. नव्या हंगामासाठी ऊस लागवड क्षेत्रामध्ये 4 टक्क्यांची वाढ होऊन 58.28 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस गाळपासाठी सज्ज असल्याचे कृषी मंत्रालयाचे म्हणणे आहे. साखर कारखानदारीच्या अंदाजानुसार इथेनॉलकडे वळविण्यात येणार्‍या साखरेसह एकूण उत्पादन 400 लाख टनांचा उंबरठा ओलांडेल, असे चित्र आहे.

अर्थकारण बिघडण्याची शक्यता

उसाचे गाळप करण्यासाठी उत्तर भारतात 1 ऑक्टोबरला हंगाम सुरू होणे क्रमप्राप्त होते; परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात उत्तर प्रदेशला पावसाने झोडपले आहे. तेथेही हंगाम उशिरा सुरू होण्याचे संकेत आहेत. याचा परिणाम उसाच्या उत्पादनावर तर होणार आहेच, शिवाय उताराही मोठ्या प्रमाणात घटू शकतो, असा एक मतप्रवाह सध्या साखरवर्तुळात आहे. सध्याचे हे चित्र हंगामपूर्व स्वरूपाचे आहे. यामध्ये हंगामादरम्यान अवकाळी पावसाने दगा दिला, तर मात्र कारखानदारीचे नियोजन आणि अर्थकारणही बिघडू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news