‘धनुष्यबाण’ गोठवल्याचा भाजप, राष्ट्रवादीला लाभ शक्य

‘धनुष्यबाण’ गोठवल्याचा भाजप, राष्ट्रवादीला लाभ शक्य

कोल्हापूर, सुरेश पवार : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने शिवसेनेवर काही प्रमाणात का होईना, परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदे गटालाही या चिन्हाचा लाभ मिळणार नसल्याने या गटालाही नवे चिन्ह घ्यावे लागणार आहे आणि या गटातील विधानसभा – लोकसभेच्या उमेदवारांना नवे चिन्ह रुजविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय संघटना आणि त्यातून फुटलेला गट अशा अडचणीत असताना, त्याचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा पेटंट बंडखोरीचा फॉर्म्युला केव्हाही डोके वर काढू शकतो, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काँग्रेस एकसंध असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षातीलच आपल्या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्याची खेळी केली होती. आता महाविकास आघाडीतील मित्र पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन निवडणुकीत खिंडीत पकडले, तर आश्चर्य वाटायला नको. जागावाटपासह मतदारसंघ निवडीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेसह काँग्रेस पक्षावरही कुरघोडीचे डावपेच आखले जातील, यात काही नवल नाही.

शिवसेनेच्या जागा हिसकावून घेण्याची राष्ट्रवादीची खेळी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रभाव क्षेत्र काही ठिकाणी समान आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूचे नेते-कार्यकर्ते निवडणुकीत उतरणार, हे दिसतच आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या जागा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणार, हे या पक्षाच्या धोरणाशी सुसंगतच असेल. शिंदे गटाच्या उमेदवाराला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.

महाविकास आघाडी निवडणुकीच्या तोंडावर किती एकसंध राहते, हा प्रश्नच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कुरघोडीचे डावपेच लक्षात आल्यावर या आघाडीला काँग्रेस पक्ष रामराम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या प्रभाव क्षेत्रात चंचुप्रवेश करण्याच्या हेतूने शिवसेनेबरोबरची युती चालू ठेवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता आणि मंत्रिमंडळ रचनेत आपल्याच पक्षाकडे महत्त्वाची खाती घेतली होती, हे विसरता येणार नाही.

बहुरंगी लढती

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट एकत्र लढतील. महाविकास आघाडी एकत्र राहिली तरी मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली बेदिलीची शक्यता नाकारता येत नाही. मनसेला आपल्या बाजूला वळवण्यात भाजपला यश न आल्यास मनसेचे उमेदवार रिंगणात असतील. शिवाय इतर पक्ष आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक बहुरंगी होईल आणि लोकसभा निवडणुकीत त्याची रंगीत तालीमच होईल.

काँग्रेसपुढे आव्हान

बहुरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट असल्याने शिवसेनेतील फुटीचा लाभ प्रामुख्याने भाजपला अधिक होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जागा आणखी वाढवण्याची शक्यता आहे. आधीच विकलांग झालेल्या काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला, तरी पक्षापुढे आहे तेवढ्या जागा टिकवण्याचे आव्हान आहे. एकेकाळी राज्यात दोनशेपेक्षा अधिक जागा सहज जिंकणार्‍या काँग्रेस पक्षाची अवस्था सध्याचा राजकीय प्रवाह लक्षात घेता, आगामी निवडणुकीत आणखी चिंतनीय होण्याची भीती आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news