कोल्हापूर : ‘सीएचबी’ प्राध्यापकांचा दिवाळीलाही ‘शिमगा’ | पुढारी

कोल्हापूर : ‘सीएचबी’ प्राध्यापकांचा दिवाळीलाही ‘शिमगा’

कोल्हापूर, प्रवीण मस्के : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही काही महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावर काम करणार्‍या प्राध्यापकांचे मानधन व विद्यापीठ मंजुरी प्रस्ताव अजून रखडले आहेत. ‘सीएचबी’ प्राध्यापकांचे मानधन मिळणार नसल्याच्या शक्यतेने त्यांची यंदाची दिवाळी ‘कडू’ होणार आहे.

दरवर्षी विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालय व विभागीय सहसंचालक कार्यालय यांच्याकडून ‘सीएचबी’ प्राध्यापक नेमणुकीची प्रक्रिया राबविली जाते. 1 ऑगस्टला शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. यंदा विभागीय उच्चशिक्षण सहसंचालकांनी शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने झाले तरी मानधनासंदर्भातील प्रस्ताव महाविद्यालयांकडून मागविलेले नाहीत. बर्‍याच महाविद्यालयांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मान्यतेचे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवले नसून धूळखात पडले आहेत.

राज्यातील तासिका तत्त्वावरील विविध प्राध्यापक संघटनांनी आंदोलन केल्यानंतर तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत त्यांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना सुधारित व महिन्याला मानधन अदा करावे, असे आदेश दिले होते. 28 सप्टेंबर 2022 रोजी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी सर्व विभागीय सहसंचालकांना परिपत्रकाद्वारे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन महिन्याला अदा करण्याचे आदेश दिले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांनंतर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालकांनी 4 ऑक्टोबर रोजी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना शुद्धीपत्रक काढले. यात तासिका तत्त्वावरील मानधन व मंजुरीचे प्रस्ताव पाठवावेत. त्यास विलंब झाल्यास महाविद्यालय प्रशासन जबाबदारी राहील, असे परिपत्रकात म्हटले आहे.

‘सीएचबी’ प्राध्यापक आंदोलनाच्या पवित्र्यात

शासनाने सुधारित मानधन अदा करण्यास सांगितले असताना शासकीय नियमाप्रमाणे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन मिळत नाही. तास व तासिका हा घोळ अद्यापही शासकीय स्तरावर सुरू आहे. त्या संदर्भात स्पष्ट आदेश नाहीत. येत्या काळात महिन्याला मानधन जमा न झाल्यास प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलनच्या वतीने विद्यापीठ व विभागीय सहसंचालक कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मंजुरीसाठी व मानधनासंदर्भात दरवर्षी विद्यापीठ प्रशासन व विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे पाठपुरावा करावा लागतो. अद्यापही बहुतांश महाविद्यालयांनी सीएचबी प्राध्यापकांचे प्रस्ताव विद्यापीठास सादर केलेले नाहीत.
– सीएचबी प्राध्यापक

Back to top button