कोल्हापूर-हैदराबाद ‘अलायन्स’ची विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर | पुढारी

कोल्हापूर-हैदराबाद ‘अलायन्स’ची विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर गेल्या पावणेचार वर्षांपासून सुरळीत सुरू असलेली ‘अलायन्स एअर’ची विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत कंपनीने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले नसले, तरी 30 ऑक्टोबरपासून या कंपनीच्या विमानसेवेची ऑनलाईन तिकीट विक्री बंद केली आहे.

‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर ‘अलायन्स’ने पहिली सेवा सुरू केली. हैदराबाद-कोल्हापूर, कोल्हापूर-बंगळूर, बंगळूर-कोल्हापूर आणि कोल्हापूर-हैदराबाद अशी ही विमानसेवा 9 डिसेंबर 2018 रोजी सुरू झाली होती.

कोल्हापूरला चांगली संधी असल्याने या कंपनीने मुंबई, गोवा मार्गांसाठीही चाचपणी सुरू केली होती. दरम्यान, 30 मार्च 2022 पासून कंपनीची कोल्हापूर-बंगळूर ही सर्वाधिक फायद्यात सुरू असलेली सेवा बंद झाली. हैदराबाद मार्गावर सकाळी सेवा उपलब्ध झाल्याने हैदराबादहून अन्य ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांसाठी ही फ्लाईट उपयुक्त ठरत होती. त्याला चांगला प्रतिसादही होता. आता ही सेवाही बंद होण्याच्या मार्गावर आहे.

कोल्हापूर-हैदराबाद या विमानसेवेचे दि. 29 ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक आणि तिकीट बुकिंग सुरू आहे. यानंतर मात्र विमानसेवेच्या वेळापत्रकात ही फ्लाईट दाखवली जात नाही तसेच त्याचे बुकिंगही होत नाही. यामुळे ही विमानसेवा बंद होणार, हे जवळपास स्पष्ट आहे.
कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर सध्या दररोज दोन विमानसेवा आहेत. यापैकी एक बंद होणार असली, तरी दुसर्‍या कंपनीची विमानसेवा सुरू राहणार आहे. मात्र, येथील एक सेवा कमी होणे प्रगतीच्या द़ृष्टीने घातकच आहे. कोल्हापूर-बंगळूर विमानसेवेची आवश्यकता आहे. त्याचा निर्णयही झालेला नाही.
फ्लाईट रद्दचे प्रकार वाढले

या कंपनीची सेवा गेल्या सहा महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. तांत्रिक कारणास्तव फ्लाईट रद्द होण्याचे प्रकार वाढत आहेत. नवरात्रौत्सवात फ्लाईट रद्द झाल्याने तेलंगणा, आंध— प्रदेशातून आलेल्या प्रवाशांनी गोंधळ घातला होता. शुक्रवारीही तांत्रिक कारणास्तव फ्लाईट रद्द झाली. यामुळे प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

कोल्हापूर विमानतळ सुसज्ज होत आहे. नाईट लँडिंग, नवीन अ‍ॅप्रन, विस्तारित धावपट्टी, यामुळे विमानसेवा वाढतील, अशी शक्यता असतानाच सुरळीत सुरू असलेली विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. विमानसेवा सुरू होताना मोठमोठी भाषणे होतात; मात्र विमानसेवा बंद झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठविण्याची गरज आहे.

Back to top button