

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दैनिक 'पुढारी' नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आला आहे. 'पुढारी' सर्वसामान्यांबाबत संवेदनशील आहे. 'पुढारी'चे सामाजिक काम पिढ्यान् पिढ्या स्मरणात राहणारे आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी काढले.
'पुढारी' रीलिफ फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक साधनसामुग्रीने सुसज्ज अशी 'अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट' रुग्णवाहिका पाटील यांच्या हस्ते, दै. 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, उद्योजक तेज घाटगे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. डॉ. जाधव यांनी 'पुढारी' समूहातर्फे उपस्थितांचे स्वागत केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, 'पुढारी'ने कधी जवळचे राजकारण केले नाही. सत्याच्या आणि सर्वसामान्यांच्या बाजूने 'पुढारी' ठामपणे उभा राहिला. यामुळे 'पुढारी'ची राज्यात तर ताकद आहेच, पण आता राज्याबाहेरही आणि दिल्लीतही 'पुढारी'ची ताकद निर्माण होत आहे. सर्वसामान्यांचे, विकासाचे प्रश्न आणि 'पुढारी'चा पुढाकार हे जणू समीकरणच बनले आहे. समाजाविषयी 'पुढारी'ची असणारी संवेदनशीलता जगातील सर्वोच्च रणभूमीवर उभारलेल्या सियाचीन हॉस्पिटलमधून दिसून येते. यामुळे 'पुढारी'चे सामाजिक काम पिढ्यान् पिढ्या स्मरणात राहणारे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनानंतर राज्याची आरोग्य यंत्रणा किती कमकुवत आहे ते समोर आले. यामुळे सध्या सरकारने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यास प्राधान्य दिल्याचे सांगत पाटील म्हणाले, कोरोना काळात मास्कही आयात करावे लागत होते, पण आता ती परिस्थिती बदलली आहे. 60 देशांत व्हॅक्सिन निर्यात करून भारताने अनेक देशातील नागरिकांचे जीव वाचवले आहेत. शासकीय रुग्णालयाच्या इमारती आहेत, यंत्रसामुग्री आहे. मात्र, प्रशिक्षित डॉक्टर, तज्ज्ञ राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकीतून, अशा तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता करून देता येईल का, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही बाबतीत आरोग्य विभागाला आर्थिक मर्यादाही येतात. अशा परिस्थितीत 'पुढारी'ने दिलेली ही रुग्णवाहिका म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ती सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरेल, असा विश्वासही त्यांनी
व्यक्त केला.
अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित म्हणाले, सध्या प्रशासनाकडे दोनच रुग्णवाहिका आहे. यापैकी एक रक्तपेढीकडे आहे. यामुळे सर्व सोयीनी सुसज्ज अशा रुग्णवाहिकेची गरज होती. 'पुढारी'च्या या रुग्णवाहिकेमुळे आता कितीही गंभीर रुग्णांना घरातून रुग्णालयापर्यंत आणणे अधिक सोयीचे होणार आहे. रुग्णालयातील रुग्णांना अन्य उपचारासाठी स्थलांतरित करण्यासाठीही या रुग्णवाहिकेचा मोठा हातभार लागणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णांसाठी या रुग्णवाहिकेचा कसा वापर होईल, या द़ृष्टीने प्रयत्न राहतील, असे त्यांनी सांगितले. उद्योजक तेज घाटगे यांनी या रुग्णवाहिकेचा अधिकाधिक रुग्णांसाठी वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. विक्रम रेपेे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्रकुमार बनसोडे, डॉ. सुरेश गंधम, डॉ. अपराजित वालावलकर, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. विकास जाधव, उद्योजक सुरेंद्र जैन, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, दै. 'पुढारी'चे सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, बंटी सावंत आदींसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सीपीआर आता खर्या अर्थाने सजले!
रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रम झाल्यानंतर चालकांनी या अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून एक फेरफटका मारला. यानंतर ही रुग्णवाहिका सीपीआरच्या ऐतिहासिक इमारतीसमोर दिमाखदार दिसेल अशी उभी करण्यात आली. गंभीर रुग्णांसाठी रुग्णालयात येईपर्यंत ही रुग्णवाहिका संजीवनीच ठरणार आहे. सध्याच्या रुग्णवाहिका चालवताना प्रचंड दमछाक व्हायची, पण आता तसे काही होणार नाही, असे सांगत चालकांनी सीपीआर आता विजयादशमीच्या दिवशी खर्या अर्थाने सजले अशी प्रांजळ प्रतिक्रिया दिली.
डॉ. योगेश जाधव यांनी नेतृत्व करावे
जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणार्या अनेक संघटना आहेत. तरुण मंडळे आहेत. या सर्वांनी दर तीन महिन्यांतून एकत्रित यावे, एकमेकांशी संवाद साधवा, आपल्या अडीअडचणी, समस्या याविषयी चर्चा करावी, त्यातून मार्ग काढावा, असा प्रयोग कोल्हापुरात राबविला जावा, त्याचे नेतृत्व डॉ. योगेश जाधव यांनी करावे, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.