कोल्हापूर : सीमोल्लंघनसाठी दसरा चौक सज्ज | पुढारी

कोल्हापूर : सीमोल्लंघनसाठी दसरा चौक सज्ज

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सीमोल्लंघन सोहळ्यासाठी दसरा चौकातील तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य चौकात लकडकोट बांधणी, शामियाना उभारणी तसेच ध्वजही डौलात उभारण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी शमीपूजन सोहळा शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे. दसरा चौकासह परिसर दोन वर्षांनी गजबजणार आहे.

दसरा महोत्सवामध्ये यंदा राजघराण्यासह जिल्हा प्रशासनाची सीमोल्लंघन सोहळ्याची तयारी मंगळवारी दिवसभर सुरू होती. दसरा चौकातील रंगरंगोटी, मंडप उभारणी, कमानींच्या सजावटीची कामे सुरू होती. भगवा ध्वजही उभारण्यात आला. मैदानाच्या मध्यभागी लकडकोट बांधण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी, गुरुमहाराज यांच्या पालख्या जुना राजवाड्यातून दसरा चौकाकडे मार्गस्थ होतील. यासोबत तोफ, उंट, घोडे, मानकरी सहभागी होतील. पालखी दसरा चौकात विराजमान होईल. याचवेळी नव्या राजवाड्यातून शाहू महाराज यांचे मेबॅक गाडीतून लवाजम्यासह दसरा चौकात आगमन होईल. सायंकाळी ठिक 6 वा. 16 मिनिटांच्या मुहूर्तावर शमीचे पूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे.

मिरवणूक मार्गावर लोककलांचे सादरीकरण

दरम्यान, दुपारपासून मिरवणूक मार्गावर विविध कला प्रकारांचे सादरीकरण होईल. चित्ररथ, लेझीम, ढोलपथक, धनगरी ढोल, गजनृत्य, मलखांब, कुस्तीची प्रात्यक्षिके, पोवाडा तसेच विविध कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूला एनसीसीचे विद्यार्थी मिरवणुकीत पुष्पवृष्टी करतील. या ठिकाणी बचत गटांचे स्टॉल्स असणार आहेत. न्यू पॅलेस ते दसरा चौक मार्गावर मोटारसायकल टीम व पोलिस विभागाचे पथक बुलेट व जीपसह सहभागी होणार आहे.

शहरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. इन्फंट्रीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला लाईन बाजार परिसरात संस्थानकालीन दसरा परंपरा आजही सुरू आहे. ग्रामदैवत हनुमान मंदिरातून सजवलेल्या पालखीतून उत्सवमूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल. सायंकाळी 5 वाजता पालखीचे प्रस्थान लाईन बाजार मैदानावर झाल्यानंतर शहाजीनगर (भट्टी विभाग) लाईन बाजार येथील मैदानावर सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे.

Back to top button