सामाजिक एकोपा जपणारा कोल्हापूरचा दसरा | पुढारी

सामाजिक एकोपा जपणारा कोल्हापूरचा दसरा

कोल्हापूर, सागर यादव : रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपती व स्वराज्यरक्षक रणरागिणी ताराराणी यांचा वारसा सांगणार्‍या आणि छत्रपतींची राजधानी असे ऐतिहासिक महत्त्व असणार्‍या करवीर संस्थानच्या ऐतिहासिक दसरा सोहळ्याची विशेष ओळख आहे.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा सणाला शतकोत्तर परंपरा लाभली आहे. पारंपरिक दसरा सणाला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सामाजिक किनार लाभली. त्यांच्या या कार्याचा वारसा आजही कोल्हापूरकरांनी जपला आहे. किंबहुना तो विकसित करून तो राज्य आणि देशव्यापी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे.

करवीर छत्रपतींचा दसरा

रणरागिणी ताराराणी यांनी शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे रक्षण केले. स्वराज्याची राजधानी इसवी सन 1709 च्या दरम्यान पन्हाळगडावर स्थापन केली. या काळात आणि पुढे इसवी सन 1788 पर्यंत पन्हाळगडावर दसरा साजरा व्हायचा. पुढच्या काळात करवीर छत्रपतींची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात स्थापन करण्यात आली. तेव्हापासून छत्रपतींचा दसरा करवीरनगरी कोल्हापुरात साजरा होऊ लागला.

पूर्वी जुना राजवाड्यासभोवताली असणार्‍या कोटातून बाहेरील (तटबंदीच्या बाहेर) गंजीमाळ येथे दसरा होत होता. कालांतराने नवीन राजवाडा बांधला गेला. नंतर शाहू काळात राजर्षी शाहू महाराज नव्या राजवाड्यात राहायला गेल्यानंतर दसरा सण ‘चौफाळा माळ’ (सध्याचा दसरा चौक) येथे साजरा होऊ लागला. कालांतराने या माळाला ‘दसरा माळ’ नाव पडले. आज याला ‘दसरा चौक’ या नावाने ओळखले जाते.

पारंपरिक लवाजम्याची भव्य मिरवणूक

दसर्‍याच्या सिमोल्लंघनादिवशी राजर्षी शाहू महाराजांच्या काळात जुना राजवाडा ते दसरा चौक अशी भव्य मिरवणूक निघायची. या मिरवणुकीत छत्रपती घराण्यातील व्यक्तींसह सरदार, जहागीरदार, मानकरी यांचा समावेश असायचा. याचबरोबर पारंपरिक लवाजम्यात हत्ती, घोडे, उंट, शिकारखान्यातील वाघ, चित्ते यासह लष्करी दलातील पायदळ-घोडदळ, तोफांचा खडखडा यांचा समावेश असे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात हत्तीवर राजघराण्याचं निशाण व जरिपटका असायचा. जुना राजवाड्यातून पारंपरिक मार्गावरून ही भव्य मिरवूणक दसरा चौकात आणली जायची.

कालौघात लवाजम्याचे स्वरूप बदलले

कालौघात लवाजम्याचं स्वरूप बदलले असले तरी दसर्‍याच्या मिरवणुकीचा थाट आजही कायम आहे. हत्ती, घोडे, उंटांची जागा स्वयंचलित वाहनांनी घेतली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी जर्मनीतून आणलेली ‘मेबॅक’ कार आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या मेबॅकमधूनच छत्रपतींचे (हुजूर स्वार्‍या) आगमन दसरा चौकात होते. सूर्यास्तावेळी शमीपूजनाचा पारंपरिक सोहळा छत्रपतींच्या हस्ते झाल्यानंतर तोफ वाजते. यानंतर आपट्याची पाने म्हणजेच सोनं लुटण्याचा सोहळा होतो. यावेळी दसरा चौकात हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित असतात.

राजर्षी शाहू काळात सामाजिक एकोप्याचे स्वरूप

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी धार्मिक व पारंपरिक स्वरूपाच्या दसरा सणाला सामाजिक स्वरूप प्राप्त करून दिले. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ध्येय-उद्देशाने त्यांनी आपली राजवट सुरू ठेवली होती. जाती-धर्म, भेदभाव नष्ट करून त्यांनी केवळ माणुसकीला महत्त्व दिले.

नवरात्रौत्सवानिमित्त दररोज निघणारी तुळजाभवानीची पालखी पारंपरिक मार्गावरून न नेता बारा बलुतेदार लोकांच्या वसाहतीतून नेण्याची क्रांतिकारी परंपरा त्यांनी निर्माण केली. नवरात्रीत दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागांतून ही पालखी मार्गक्रमण करत होती. यामुळे सर्व जाती-धर्मांतील लोक या सोहळ्याला जोडले गेले आणि कोल्हापूरचा नवरात्रौत्सव व दसरा सण ‘लोकोत्सव’ म्हणून नावारूपाला आला. नवरात्रौत्सवाबरोबरच शिवछत्रपती व रणरागिणी ताराराणी यांच्या रथोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा व प्रबोधनावर भर दिला.

दसरा सणाचे वैशिष्ट्य ‘मेबॅक’ कार…

करवीर नगरीच्या ऐतिहासिक दसरा सणाची शान असणारी मेबॅक कार यंदा 86 व्या वर्षात पदार्पण करत आहे. जगप्रसिद्ध असणार्‍या कोल्हापूच्या शाही दसर्‍यात ही मेबॅक कार लोकांच्या आकर्षणाचा विषय असतो. नवरात्रौत्सवांतर्गत विजयादशमीला होणार्‍या सिमोल्लंघनासाठी छत्रपती घराण्यातील सदस्यांचे (हुजूर स्वार्‍या) या मेबॅकमधूनच ऐतिहासिक दसरा चौकात आगमन होते. जर्मनीचा हुकूमशहा व लढवैया सेनानी अ‍ॅडॉल्फ हिटलर अशीच मेबॅक कार वापरायचा. यामुळे या गाडीला ‘हिटलर रोल्स’ म्हणूनही ओळखले जाते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मेबॅकचे उत्पादन बंद पडले. यामुळे जगभरात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच मेबॅक कार शिल्लक आहेत. त्यापैकी एक आपल्या कोल्हापुरात असल्याचा सर्वांना अभिमान आहे.

मेबॅक कारची वैशिष्ट्ये…

छत्रपती राजाराम महाराज यांनी इसवी सन 1936च्या सुमारास इंग्लंड येथील ‘रोल्स राईस’ या कंपनीला मेबॅक कार बनविण्याची ऑर्डर दिली. कोल्हापूर (करवीर) संस्थानच्या ध्वजाचा रंग (सॅफरॉन), छत्रपतींचा शिक्का (मोर्तब), शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानी अशी वैशिष्ट्ये मेबॅकवर एकवटली आहेत. कारचा मूळ क्रमांक बीवायएफ 8776 असा होता. मात्र, कोल्हापुरात आणल्यानंतर तिचा क्रमांक ‘कोल्हापूर 1’ असा करण्यात आला.

Back to top button