कोल्हापूर : अनैतिक संबंधातून महिलेचा कोयत्याने गळा चिरून खून | पुढारी

कोल्हापूर : अनैतिक संबंधातून महिलेचा कोयत्याने गळा चिरून खून

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : लग्नाचा प्रस्ताव ठोकरून पैशासाठी तगादा लावणार्‍या प्रेयसीचा धारदार कोयत्याने गळा चिरून अमानुष खून केल्याची थरारक घटना कसबा बावडा येथील शहाजीनगर – लाईन बाजार परिसरात रविवारी भरदिवसा घडली. मारेकर्‍याच्या हल्ल्यात कविता प्रमोद जाधव (वय 34, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी) हिचा मृत्यू झाला. संशयित राकेश शामराव संकपाळ (वय 30, रा. लाईन बाजार, शहाजीनगर) याला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी अंगावर शहारे आणणारी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील महिलेच्या खुनापाठोपाठ कसबा बावड्यात झालेल्या घटनेमुळे पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे. खूनाच्या घटनेनंतर पळून जाणार्‍या राकेशला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पाठलाग करून ताराराणी चौक परिसरात मुसक्या आवळल्या.

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

अनैतिक संबंधातून भरदिवसा महिलेचा खून झाल्याने घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, तानाजी सावंत, शाहूपूरीचे राजेश गवळी यांच्यासह अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या गळ्यासह शरीरावर अनेक ठिकाणी कोयत्याने सपासप वार केल्याने कविताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.

पतीच्या मृत्यूनंतर महिलेशी जवळीक

पोलिस सूत्रांनी सांगितले की, कसबा तारळे येथील कविता जाधव आणि संशयित संकपाळ हे परस्परांचे नातेवाईक आहेत. चार वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याने शिवणकामसह मोलमजूरी करुन तीन मुलांसह कुटुंबीयाचा उदरनिर्वाह करीत होती. दीड वर्षांपूर्वी कविताच्या मुलीची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने तिच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.

अनैतिक संबंधाची कुटुंबीयांसह नातेवाईकांत चर्चा

संकपाळने त्या काळात वैद्यकीय उपचारासाठी महिलेला आर्थिक मदत केली. त्यातून दोघांमध्ये जवळीक होऊन त्यांच्या अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघेही एकमेकाला भेटत असत. फिरायलाही जात असत. त्यांच्यातील अनैतिक संबंधांची कुटुंबासह नातेवाईकांमध्ये उलट-सुलट चर्चा होती. संकपाळचे आई-वडील, भाऊ तसेच अन्य नातेवाईकांनी त्याला वारंवार जाब विचारला होता.

पैशाच्या तगाद्यातून वारंवार खटके

अनैतिक संबंध ठेवण्याऐवजी लग्न करून आपण दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहू, असा संशयिताचा कविताकडे प्रस्ताव होता. मात्र तिने त्यास नकार देत सतत पैशाचा तगादा लावला. यावरून त्यांच्यात सतत खटके उडत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात जोरात वाद झाला होता. त्यामुळे संशयित कमालीचा त्रस्त बनला होता. शनिवारी (दि. 1) सायंकाळी याच कारणावरून त्यांच्यात तीव— मतभेद झाले होते. पैसे देण्यास नकार देणार्‍या राकेशला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून बदनामीची धमकी कविताने दिली होती.

प्रेयसीला कायमचे संपविण्याचा रचला कट

कविताच्या आक्रस्ताळेपणामुळे भेदरलेल्या राकेशने तिचा कायमचा काटा काढण्याचा बेत आखला. शनिवारी रात्री त्याने धारदार कोयता खरेदी करुन घरात आणून ठेवला. रविवारी कविताला संपवायचेच या इराद्याने त्याने आपल्या वृद्ध आई-वडिलांना गावाकडे पाठविले आणि दोन वाजता कविताला घरी येण्यास बजावले. ठरलेल्या वेळेप्रमाणे कविता दुपारी दोन वाजता कसबा बावडा येथील शहाजीनगर-लाईन बाजार येथील संशयिताच्या घरी आली.

हाताघाईनंतर कोयत्याने वार

नेमके त्याचवेळी संकपाळचा भाऊ घरी आला. त्यानेही या दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यासमोर दोघांत वाद सुरु राहिला. भाऊ घरातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा या दोघांत खडाजंगी सुरु झाली. हातघाई सुरु झाल्यानंतर राकेशने धारधार कोयत्याने कविताच्या गळ्यासह शरीरावर जोरदार वार केले. या वर्मी हल्ल्यात कविता रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

पाठलाग करुन संशयित जेरबंद

गंभीर गुन्हा करुन राकेश ताराराणी चौक पुतळामार्गे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, अजय गोडबोले, महेश खोतसह अन्य पोलिसांनी पाठलाग करुन राकेशला ताराराणी चौकात पकडले.

पोलिसांना केले प्रत्युत्तर

पोलिसांनी ताब्यात घेताच राकेशने अधिकार्‍यांना प्रत्युत्तर केले. आपण कोणाचा खून केला नाही आणि खूनाची आपणाला काही माहिती नसल्याचे सांगून संभ—मावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राकेशला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आणण्यात आले.

पोलिसी खाक्यामुळे खुनाची कबुली

पोलिसांनी आपल्या खाक्या दाखविताच राकेशने कोयत्याने वार करुन प्रेयसीचा खून केल्याची कबुली दिली. राकेश संकपाळविरुद्ध शाहूपूरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.

काळजाचा ठोका चुकला

संशयिताने थंड डोक्याने प्रेयसीचा खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या परिसरात अनेक कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. या घटनेनंतर दोन तासांहून अधिक काळ परिसरातील नागरिकांना त्याची माहिती नव्हती. पोलिस आल्यानंतर कुजबुज सुरू झाली. राकेशने प्रेयसीचा खून करून मृतदेह खोलीत ठेवल्याची माहिती समजताच नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला.

तडफडणार्‍या प्रेयसीवर पुन्हा वार

जीवाच्या आकांताने तडफडणार्‍या कवितावर राकेशने पुन्हा हल्ला केला. कविताचा मृत्यू झाल्याची खात्री होताच घराला कडी लावून राकेशने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात त्याच्या कपड्यावर उडालेले रक्ताचे डाग पाहून परिसरातील काही तरुणांनी एलसीबीचे निरीक्षक संजय गोर्ले यांना घटनेची माहिती दिली.

Back to top button