कोल्हापूर : महिलेच्या हत्येमुळे तीन मुले पोरकी..! दोन वर्षात पितृछत्रा पाठोपाठ मातृछत्रही हरपले | पुढारी

कोल्हापूर : महिलेच्या हत्येमुळे तीन मुले पोरकी..! दोन वर्षात पितृछत्रा पाठोपाठ मातृछत्रही हरपले

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील श्रीमती कविता प्रमोद जाधव या विधवा महिलेचा रविवारी कसबा बावडा येथे अमानुष खून झाला. या वृत्ताने कसबा तारळे तसेच जवळच तिचे माहेर असलेल्या खिंडी व्हरवडे गावात खळबळ माजली आहे.

दोन वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले, त्यानंतर आता महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे महिलेच्या तीन शाळकरी मुलांवरील मातृछत्रही हरपल्याने कसबा तारळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खिंडी व्हरवडे येथील भिकाजी संतु पोवार यांची कन्या असलेल्या कविता यांचा विवाह भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथील राजू उर्फ प्रमोद जाधव यांच्याशी झाला होता. मात्र वडिलांच्या नोकरीनिमित्त प्रमोद हे कुटुंबासोबत मुंबई येथे राहत होते. पंधरा वर्षांपूर्वी वडिलांच्या निवृत्तीनंतर कसबा तारळे येथे घर खरेदी करून जाधव कुटुंब येथे स्थायिक झाले. त्यानंतर प्रमोदच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर इलेक्ट्रिशियन असलेल्या प्रमोदचेही दोन वर्षांपूर्वीच निधन झाले.

त्यानंतर कविता शिवणकाम करून सासू आणि तीन मुले अशा कुटुंबाचा चरितार्थ चालवत होत्या. त्यांची एक मुलगी डी फार्मसीचे तर दुसरी मुलगी आणि लहान मुलगा शालेय शिक्षण घेत आहेत. गडहिंग्लज येथे शिकत असलेल्या मुलीला भेटायला म्हणून त्या आज सकाळी कसबा तारळे येथून बाहेर पडल्या होत्या असे सांगण्यात आले. दुपारी कसबा बावडा येथील शहाजी नगरात त्यांचा कोयत्याने गळा चिरून खून झाल्याचे स्पष्ट झाले.

कविता यांचा मारेकरी असलेल्या राकेशचे अधून मधून कसबा तारळे येथील जाधव कुटुंबीयांच्या घरी येणे जाणे होते असे सांगण्यात आले. कविता यांच्या खुनाचे वृत्त कसबा तारळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे असलेल्या माळावरील गल्लीत कळताच गल्ली सून्न झाली. हळूहळू हे वृत्त कसबा तारळे आणि खिंडी व्हरवडे येथे समजतात खळबळ माजली. पितृछत्रा पाठोपाठ मातृछत्र ही हरपलेल्या कविताच्या मुलांविषयी हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

हेही वाचा

Back to top button