Katyayani : दुर्गेचे सहावे रूप कात्यायनी

चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूल वरवाहना ।
कात्यायनी शुभं ददयाद्देवी दानव घातिनी॥ (Katyayani)
दुर्गेचे हे सहावे रूप ‘कात्यायनी’ (Katyayani) या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. परिपूर्ण आत्मदान करणार्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले, यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्षे भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.
काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता, अशी ही कथा पुराणात आहे.
Katyayani : कात्यायनी फलदायक
कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेज:पुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीच्या उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते. तो ईहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव होतो. जी व्यक्ती मातेची मनापासून पूजा करते, ती रोग, भय, दुःख आणि संतापापासून मुक्त होते. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.
हेही वाचलंत का?
- Navratri 2022 : दुर्गा मातेच्या रूपात साकारल्या ‘या’ सुंदर अभिनेत्रींनी भूमिका
- Navratri 2022 : दुर्गा मातेच्या रूपात साकारल्या ‘या’ सुंदर अभिनेत्रींनी भूमिका
- Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह