कोल्हापूर, विकास कांबळे : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे 'राजाराम'चा आखाडा गाजत आहे. यानिमित्ताने आ. सतेज पाटील व माजी आ. अमल महाडिक आमनेसामने उभे ठाकले आहेत.
आ. सतेज पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष आता संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. आ. पाटील यांनी महाडिक यांच्या सर्व सत्तास्थानाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. महापालिकेची सत्ता प्रथम त्यांनी ताब्यात घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद, बाजार समितीमध्ये वर्चस्व मिळाले. त्यानंतर त्यांनी गोकुळवर आपले लक्ष केंद्रित केले. पहिल्या प्रयत्नाला त्यांना यश आले नाही. परंतु, अपयश आले म्हणून न थांबता त्यांनी गोकुळमधील महाडिक यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी पाच वर्षे रान उठविले. गेल्या निवडणुकीत मात्र आ. पाटील यांना यश आले आणि त्यांनी गोकुळ ताब्यात घेतले. आता राजाराम साखर कारखान्याकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला आहे.
राजाराम साखर कारखान्याचे 1,346 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचा निकाल कारखान्याच्या विरोधात लागला. त्यामुळे 1346 सभासदांचे सभासदत्व रद्द झाल्याने महाडिक गटाला हादरा बसला आहे. गोकुची निवडणूक होईपर्यंत आ. पाटील यांचे टार्गेट महादेवराव महाडिक होते. परंतु, राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने त्यांनी आपला मोर्चा महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव माजी आ. अमल महाडिक यांच्याकडे वळविला आहे.
कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांनी कसबा बावडा येथे मेळावा घेऊन विरोधकांवर टीकेचे झोड उठविताना राजाराम कारखान्याच्या सातबारावर अमल महाडिक यांचे नाव लागेल, असा आरोप केला होता. यावर महाडिक यांनीही आक्रमकपणे पलटवार करून, 'राजाराम कारखान्याच्या सातबारावर नाव लावायला मी काही सतेज पाटील नाही, असे प्रत्युतर दिले होते. एवढेच नव्हे, आजपर्यंत आ. पाटील यांनी खालच्या पातळीवर केलेल्या आरोपाकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो; परंतु आता त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिल्यामुळे आ. पाटील व महाडिक यांच्या संघर्षाला आता अधिकच धार आली आहे.